| उरण | वार्ताहर |
दीप अमावस्येच्या निमित्ताने शनिवारी (दि. 3) यूईएस स्कूलमध्ये दीपपूजा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दीपपूजेसाठी माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आणले होते. शाळेच्या व्हरांड्यातील एका टेबलावर समया, लामण दिवे, पणत्या, निरांजने असे अनेक प्रकारचे रंगीबेरंगी दिवे मांडून सजावट करण्यात आली होती. दिव्यांच्या प्रकाशामुळे केलेली सजावट डोळ्यांना अधिकच नयनरम्य भासत होती. याप्रसंगी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे गीत सादर केले.
यूईएस संस्थेच्या सहसचिव अॅड. अपूर्वा ठाकूर, स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या तसेच माध्यमिक, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका ह्यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करुन शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. दीप अमावस्येच्या निमित्ताने सर्वत्र ज्ञानाची ज्योत पेटवून, जगभरातील अज्ञानरुपी अंधकार दूर व्हावा, यासाठी सर्वांनी मनोभावे प्रार्थना केली.







