दीपिका कुमारीचे अपयश कायम; रिकर्व्हमध्ये भारतीय पदकविना

| येचॉन | वृत्तसंस्था |

भारताची अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारी मातृत्वानंतर पुन्हा तिरंदाजीतील आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र येथील विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावरील अनुक्रमे लीन सिह्यॉन आणि अलजेंद्रा वॅलेंन्सिया यांच्या वर्चस्वाला शह देऊ शकली नाही.

दीपिकाच्या या अपयशामळे रिकर्व्ह हा प्रकारातून भारतीय तिरंदाज रिकाम्या हाती परतणार आहे. हा रिकर्व्ह प्रकार हा ऑलिंपिकमधील महत्त्वाचा प्रकार आहे. रिकर्व्हमध्ये अपयश आलेले असले तरी भारतीयांनी कंपाऊंड प्रकारात एक सुवर्ण आणि एक रौप्य अशी कामगिरी केली आहे. शनिवारी झालेल्या कंपाऊंड प्रकाराच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने (ज्योती-परनीत-आदिती) सुवर्णपदक जिंकले होते तर मिश्र दुहेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते; पण या पदकांमध्ये दीपिकाचा समावेश नव्हता..दक्षिण कोरियाच्या 20 वर्षीय लीन हिने या विश्‍वकरंडक स्पर्धेत दीपिकावर 6-2 (28-26, 28-28, 28-27, 27-27) अशी मात केली. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या विश्‍वकरंडक तिरंदाजीतही लीनने दीपिकाचा पराभव केला होता. गेल्या महिन्यातील या विश्‍वकरंडक स्पर्धेत दीपिकाचा सरळ सेटमध्ये पराभव झाल्यामळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. आज मात्र तिने दुसर्‍या आणि चौथ्या सेटमध्ये लीन हिला कडवी लढत दिली होती..ब्राँझपदकाच्या लढतीतही दीपिकाची हार झाली. वॅलेंन्सियाकडून ती 4-6 (26-29, 26-28, 28-25, 27-25, 26-29) असे पराभूत झाली. या सामन्यात तीन- चार सेट जिंकण्याची धैर्य दाखवले होते; परंतु वॅलेंन्सियाला ती हरवू शकली नाही. दीपिकाविरुद्धच्या चार सामन्यात वॅलेंन्सिया हिचा हा दुसरा विजय आहे.या मातब्बर खेळाडूंकडून झालेल्या पराभवामुळे दीपिकासाठी ऑलिंपिकपूर्वी धोक्याची घंटा वाजली आहे. चौथ्यांदा ती ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ती दक्षिण कोरियाचे माजी दिग्गज तिरंदाज किम ह्युन ताक यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे. विश्‍वकरंडक स्टेज-3 ही स्पर्धा जूनमध्ये होत असून ती ऑलिंपिक पात्रतेसाठी अखेरची स्पर्धा असणार आहे.

Exit mobile version