। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्रातील एका ऑनलाइन अॅपवर काही मुस्लीम महिलांचे आक्षेपार्ह फोटो अपलोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार उघडकीस येताच मुस्लीम महिलांसह नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित अॅपवर देशातील काही प्रसिद्ध आणि नामांकित महिलांचे आक्षेपार्ह फोटो अपलोड करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर संबंधित फोटोंवर अश्लील मजकूर लिहिला जात आहे.
शिवाय काहीजणांकडून या फोटोंचा सौदा केला जात आहे. यामध्ये एका महिला पत्रकाराचा देखील समावेश आहे. संबंधित महिला पत्रकाचा फोटो अश्लील मजकूरासह व्हायरल केला जात आहे. याप्रकरणी पीडित महिला पत्रकाराने दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देखील मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली.