मजबूत राष्ट्रासाठी मोदींचा पराभव गरजेचा

अमरावतीचे महाविकास आघाडीचा प्रचार

| अमरावती | वृत्‍तसंस्था |

आज भारताच्या शेजारील राष्ट्रांची परिस्थिती अतिशय विदारक झालेली आहे. तेथील राज्यघटना कमकुवत पडल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून डॉ. बाबााहेब आंबेडकर यांच्या संविधानाला नख लावण्याचा प्रयत्न होत असून संविधान वाचविण्यासाठी तसेच भारताला मजबूत राष्ट्र बनविण्यासाठी मोदींचा पराभव आवश्यक आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सोमवारी (दि.22) अमरावती येथे केले. अमरावतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
मागील दहा वर्षांच्या सत्ताकाळात देशात तुमची सत्ता आहे. त्यामुळे तुम्ही देशासाठी काय केले ते सांगण्याची गरज असताना तुम्ही मात्र काँग्रेसने 70 वर्षांत काय केले, असा प्रश्न उपस्थित करून देशातील जनतेची फसवणूक करीत आहात, असे पवार म्हणाले. देशातील संसदीय लोकशाही धोक्यात आली असून देशातील विद्यमान सरकारचा पराभव करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन क्षीप्रा मानकर यांनी, तर प्रास्ताविक आ. ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.

व्यासपीठावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आ. मुजफ्फर हुसैन, माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, बबलू देशमुख, अनंत गुढे, उमेदवार बळवंत वानखडे, विलास इंगोले, बबलू शेखावत, सुधीर सूर्यवंशी, सुनील खराटे, पराग गुडधे, लक्ष्मी शर्मा, प्रदीप राऊत, किशोर बोरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

एकदा चूक केली
मागील वेळी आपण अमरावती लोकसभा मतदारसंघात सध्याच्या खासदारांना मते देण्याचे आवाहन करून मोठी घोडचूक केली होती, त्याचे परिणाम आजही दिसून येत आहेत. त्यामुळे ही चूक सुधारण्यासाठी आता आपण येथे आल्याचे शरद पवार यांनी सांगितले. अशी चूक परत होणार नाही, असेही ते म्हणाले.
देशात सरकारविरोधी लाट
देशात पहिल्यांदाच सरकारविरोधात मोठी असंतोषाची लाट निर्माण झाली आहे. आणीबाणीनंतर ज्याप्रमाणे देशात सरकारविरोधात लाट होती तशीच परिस्थिती आज देशात आहे. मोदींची गॅरण्टी ही विकासाची नसून भ्रष्टाचाऱ्यांना अभय देणारी आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
Exit mobile version