स्थानिक, वन खाते व प्रशासनाचे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष?
| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे येथे बेसुमार वृक्षतोड करण्यात आलेली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे येथे बेसुमार वृक्षतोड करण्यात आलेली आहे. सुमारे अडीशे एकरच्या परिसरातील अनेक दुर्मिळ वृक्षांची तोड अजूनही सुरु आहे. या वृक्षतोडीकडे वनखाते व तालुका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. जमीन मालक ही वृक्षतोड करून जमीन ही एका बलाढ्य कंपनीला विकण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जाते.
जावेळे परिसरातील जमिनी राजस्थानी व गुजराती व्यक्तींनी अतिशय अल्प प्रमाणात स्थानिक नागरिकांकडून घेतलेल्या आहेत. सद्यःस्थितीत जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असताना पैशाच्या लोभापोटी जंगले नष्ट केली जात आहेत. यावर्षी तापमानात अमूलाग्र वाढ झालेली आहे. व्यापारी व धनदांडग्या व्यक्तींनी मातीमोल किमतीत जमिनी घेऊन कंपन्यांना सोन्याच्या भावाने विकण्यासाठी ही जंगलतोड करण्यात आलेली आहे का, असा आरोप स्थानिक जनता करत आहे.
वन खाते प्रशासनाकडून 250 पेक्षा जास्त एकरावरील वृक्षांची तोड करण्याची परवानगी संबंधित जमीन मालकास कुणी दिली, हा प्रश्न आहे. जंगलतोड झाल्यानंतर निर्माण झालेला लाकूडफाटा कोणत्या व्यावसायिकांनी विकत घेतला, याबद्दल अद्याप माहिती मिळालेले नाही. या जंगलतोडीमध्ये सर्वसामान्य वृक्षांसोबत खैर, साग व इतर दुर्मिळ वृक्षांचासुद्धा समावेश आहे.
सर्वांची चिडीचूप जावेळे गावातील एकरमधील जमिनीवर वृक्षतोड होत असताना स्थानिक ग्रामस्थांनी कुणीही आवाज उठवलेला नाही. जंगल तोड करणाऱ्या शेतकऱ्यांनी तालुका प्रशासनातील अधिकारी आणि वन खाते यांच्याशी समन्वय साधत अतिशय शांततेत सदरची जंगलतोड केलेली आहे. पर्यावरणप्रेमींकडून सदरच्या जंगलतोडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकारी कारवाई करणार? जंगलतोड करणारी शेतकरी व प्रत्यक्ष जंगलतोडीचे अंमलबजावणी करणाऱ्या ठेकेदाराविरोधात व जंगलतोडीला अभय देणाऱ्या वन खाते प्रशासनातील बाबू लोकांवर जिल्हाधिकारी कारवाई करणार का, हा एक प्रश्न आहे. सर्वसामान्य व्यक्तींनी अनवधानाने व चुकून एखाद्या वृक्षाची तोड केल्यास वन खाते तात्काळ कारवाई करते. मात्र, जावेळे येथे कारवाई कधी होणार, असा प्रश्न विचारला जातोय.
पर्यावरण संतुलन बिघडणार वृक्षतोड होत असलेल्या सर्व जमिनी भोगवटा वर्ग एक किंवा भोगवटा वर्ग दोन आहेत. सदरच्या जमिनीवरती कोणत्याही स्वरूपाचे पीक घेतले जात नाही. मात्र, पर्यावरणाच्या संतुलनाच्या दृष्टिकोनातून जंगलांची भूमिका अनन्यसाधारण आहे. सदरची जंगलतोड भविष्यातील संकटाची चाहूल ठरू शकते. यापूर्वीच सीआरझेडमध्ये अतिक्रमण केलेल्या व अनधिकृतरित्या बांधकाम केलेल्या व्यावसायिकांचा मुद्दा गाजत असताना सदरच्या जंगलतोड करणाऱ्या सर्व व्यक्तीविरोधात तात्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे.
जावेळे गावातील जमीनमालकांच्या जागेची स्वच्छता होत आहे. ते आम्हाला मान्य आहे. बाकीचे काही मला माहित नाही.
मनोहर सावंत,
सरपंच, वावेतर्फे श्रीवर्धन
वनखात्याची भूमिका संशयास्पद
जावेळे वृक्षतोडीबाबत वनक्षेत्रपाल संजय पांढरकामे यांच्याशी बोलले असता ते काही दिवस रजेवर असल्याचे सांगितले. मात्र, वृक्षतोड ही गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. अतिरिक्त कार्यभार असलेले वनखात्याचे सुधाकर थळे यांनी अर्ज करा, मग माहिती देतो असे बोलून अधिक बोलायचे टाळलं.