क्षमतेपेक्षा बॉक्साइड जास्त उत्खनन; शासकीय यंत्रणेचे पुर्णपणे दुर्लक्ष
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यात क्षमतेपेक्षा जास्त बॉक्साइडची वाहतूक अत्यंत जोमात सुरू आहे. त्याचप्रमाणे बॉक्साइडचे उत्खनन परवानगी न घेता किंवा घेतलेल्या परवानगी पेक्षा जास्त पटीने करून अनेकांनी पैसे कमावण्याचा धंदा जोरात सुरू ठेवलेला आहे. मात्र, या सर्व प्रकाराकडे तालुका प्रशासनाने पूर्णपणे काणाडोळा केला आहे.
क्षमतेपेक्षा जास्त बॉक्साईट घेऊन जाणारे दहा चाकी डंपर बॉक्साईड खाणी पासून वडघर पांगलोली, त्याचप्रमाणे चांदोरे या ठिकाणी बॉक्साइडची वाहतूक करत असतात. याबाबत पेणचे प्रादेशिक परिवहन आधिकारी महादेव सूर्यवंशी यांच्याजवळ संपर्क साधला असता त्यांनी क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहतुकीवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई संबंधितांवर करण्यात आलेली नाही. तसेच, तालुक्यात विविध राजकीय पक्षांशी संबंधित असलेले स्थानिक नेते आपल्या सोयीनुसार बॉक्साइडचा धंदा जोरात चालवण्यासाठी पक्षांतर करत असल्याचे देखील स्थानिकांकडून बोलले जात आहे.
तालुक्यात दिवसेंदिवस पर्यटन वाढत आहे. या ठिकाणी येणारा पर्यटक हा या ठिकाणच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ पडल्यामुळे येत असतो. परंतु, या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त बॉक्साइड उत्खनन करून श्रीवर्धन परिसरातील वनसंपत्ती व डोंगर पूर्णपणे उघडे होत चालले आहेत. डोंगराळ परिसरात खोलवर ड्रिलिंग करून स्फोट घडवले जात असून, उत्खननानंतर खड्डे बुजवणे अथवा पुनर्लागवड केली जात नसल्याने मोठ्या प्रमाणावर पोकळी निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी साठल्यामुळे भूस्खलनाचा धोका वाढत चालला आहे. केरळमधील वायनाड येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे दुर्लक्ष भविष्यात गंभीर संकटाला निमंत्रण देणारे ठरू शकते, असा इशारा जाणकार व्यक्त करत आहेत.
बॉक्साइडचे उत्खनन करणाऱ्या कंपन्यांना अटी व शर्ती घालून दिलेल्या असतात. त्यामध्ये बॉक्साइड उत्खनन केलेल्या ठिकाणी पुन्हा मातीचा भराव करून त्यावरती झाडे लागवड करण्याची अट आहे. परंतु, अशा प्रकारे कोणत्याही उत्खनन करणाऱ्या कंपनीकडून झाडे लावण्यात येत नाहीत. बॉक्साईड उत्खनन करताना किती टनाची रॉयल्टी भरली आहे व किती टन बॉक्साईड काढले जात आहे, यावर कोणत्याही शासकीय यंत्रणेचे लक्ष नाही. या ठिकाणी ‘आंधळ दळतंय कुत्र पीठ खातंय’ या म्हणीच्या उक्ती प्रमाणे कारभार सुरू असल्याचे बोलले जात आहे. तसेच, क्षमतेपेक्षा जास्त बॉक्साइड वाहतूक व फॉरकॉन कंपनीच्या दगड वाहतुकीमुळे तालुक्यातील रस्त्यांची देखील बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे पेण येथील प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी या सर्व प्रकाराकडे डोळेझाक करत असल्याचे आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहेत. तसेच, प्रादेशिक परिवहन विभागाने क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहतूकीवर कारवाई केली नाही, तर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेणार असल्याचे येथील नागरिकांनी बोलून दाखविले आहे.
भूस्खलनाची शक्यता
भविष्यात अशाच प्रकारे बॉक्साइड उत्खनन सुरू राहिले तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलनासारखे प्रकार घडण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे. पावसाचे पाणी साठल्यामुळे भूस्खलनाचा धोका वाढत चालला आहे.
