परवानगी पन्नासची उत्खनन हजारो ब्रासचे; अधिकारी भुमाफियांच्या दावणीला
| दिघी | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यात बेकायदा गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचा सुळसुळाट वाढला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा माती उत्खनन केले जात आहे. दरम्यान, बोर्लीपंचतन परिसरातील खुजारे येथून खासगी व्यावसायिकांकडून भरमसाठ उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. गंभीर बाब म्हणजे नाममात्र स्वामित्वधन म्हणजेच रॉयल्टीच्या दुप्पट-तिप्पट उत्खनन केले जात आहे. त्यामुळे सरकारचे कोट्यवधींचे महसूल बुडत आहे.
श्रीवर्धन तालुक्यात गौण खनिज उत्खननात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा होत आहे. तालुक्यात विविध गावांत जमिनीतील माती व मुरूम काढण्याची शासनाने परवानगी दिली आहे. या माती उत्खननाचे महसूल कार्यालयातून रॉयल्टी चलन काढले जाते. मात्र, चलनावर किती ब्रास माती उत्खनन करणार, याची नोंद नसून केवळ रक्कमच दाखवली जाते. त्यामुळे शासनाला रॉयल्टी कमी भरायची आणि हजारो ब्रास माती व मुरूम उचलायचा. आणि त्यातून बक्कळ पैसा कमवायचा, असा गोरस धंदा सध्या सुरू आहे. त्यामुळे सरकारचा महसूल बुडत असून उत्खनन करणारयांकडून काही भ्रष्ट अधिकारयांचे खिसे भरले जात आहेत, असा आरोप ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. त्याच बरोबर तालुक्यातील डोंगरांचे नैसर्गिक सौंदर्य महसूल विभागाच्या नाकर्तेपणामुळे संपुष्टात येत असल्याचे देखील ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.
भूस्खलनाचा धोका
श्रीवर्धन तालुक्यात कोट्यवधींची उलाढाल होत असून पुणे-मुंबईपासून जवळ असलेल्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प व रिसॉर्ट उभारले जात आहेत. त्यासाठी येथील डोंगर पोखरण्यात येत आहेत. हे डोंगर पोखरताना कुठलेही नियम पाळले जात नसल्याने भूस्खलनासारखी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
अधिकारयांचे दुर्लक्ष
प्रांताधिकारी किंवा तहसीलदार यांनी उत्खनन व भराव टाकण्यास परवानगी दिली असताना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मंडलाधिकारी व तलाठी यांचीही जबाबदारी असते. मात्र, स्थनिक पातळीवर अशा बेकायदा उत्तखननाकडे संबंधित अधिकरयांकडून दुर्लक्ष केले जाते. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता नेहमीच त्यांचा नंबर नॉट रिचेबल असतो.







