शेतकर्‍यांवर अवकाळी पावसाची अवकृपा

। चिरनेर । वार्ताहर ।
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे उरण पूर्व विभागातील भात पीक पाण्याखाली आले आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी शेतात असलेल्या पावसामुळे तयार झालेले पिक व कापणी केलेल्या पिकाची नासाडी झाली आहे, त्यामुळे बळीराजा पुरता उद्ध्वस्त झाला आहे.
उरण तालुक्यातील शेतकर्‍यांचे भात हे एकमेव नगदी पीक आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे जोरदार पीक शेतात साचलेल्या पाण्याखाली बुडाले आहे. आत्ता तर कापणीला सुरुवात झाली होती पण अवकाळी पावसामुळे भात शेतीची नासाडी झाली आहे. साचलेले पाणी कितीही प्रयत्न करूनही कमी होत नसल्याने पाण्यात बुडालेले पिक कुजून त्याची चिखल माती झाल्याचे चित्र शेतात दिसत आहे. या अस्मानी संकटाने शेतकरीवर्ग पूर्ण उद्ध्वस्त झाला असून तो शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version