जेएसएम महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा

। अलिबाग। विशेष प्रतिनिधी ।
जे. एस. एम. महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा अ‍ॅड. दत्ता पाटील तथा आदरणीय दादा यांच्या जन्मदिनी शुक्रवार दि. ४ मार्च २०२२ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अ‍ॅड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, प्राचार्य डाॅ. अनिल पाटील, उपप्राचार्य डाॅ.नीळकंठ शेरे, ऍड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ च्या प्राचार्या ऍड. रेश्मा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न झाला. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्यांनी सर्व यशस्वी पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
आपल्या मनोगतात प्राचार्य डाॅ.अनिल पाटील यांनी अ‍ॅड. दत्ता पाटील यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या पदवीचा उपयोग करून जगाकडे स्वतंत्र दृष्टीकोनातून पाहायला शिकावे व एक जबाबदार नागरिक म्हणून समाजासाठी आपले योगदान द्यावे असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. तसेच स्वतःच्या बुद्धिमत्तेवर व कर्तृत्वावर दैदिप्यमान यश प्राप्त करून महाविद्यालयाचे व विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन प्राचार्यांनी केले. परीक्षा विभाग प्रमुख प्रा.के.बी.चौगुले यांनी शैक्षणिक अहवालाचे वाचन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अ‍ॅड. गौतम पाटील यांनी पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यासंबधीची उद्घोषणा केली. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रा. अशोक जाधव, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रा. टी. डी. वाल्डे व कला शाखेतील विद्यार्थ्यांना प्रा. पी. डी. दातार यांनी पदवी घेण्यासाठी निमंत्रित केले.
यानंतर कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र अध्यक्ष मा. अ‍ॅड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली व गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारण्याचा संस्मरणीय अनुभव प्राप्त झाल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी या सोहळ्याच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आशुतोष मेहेंदळे यांनी केले. यावेळी प्रा.जयेश म्हात्रे, प्रा.श्वेता पाटील, डॉ.मिनल पाटील, प्रा.श्रेया केळकर यांनी प्रमाणपत्रांचे वाचन केले. मनश्री पवार आणि अश्विन शिंदे या पदवीधर विद्यार्थ्यांनी आपले महाविद्यालयातील शैक्षणिक अनुभव व्यक्त करून सर्व गुरुजनांचे आभार मानले. त्याचप्रमाणे उल्हास पवार यांनी पालकांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त करून महाविद्यालयाचे आणि सर्व प्राध्यापकांचे आभार मानले.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या पदवी, पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्र महाविद्यालयाच्या कार्यालयात उपलब्ध असून संबंधित विद्यार्थ्यांनी कार्यालयीन वेळेत ती घेऊन जावीत असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.

Exit mobile version