| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात सर्वत्र गणेशोत्सव थाटामाटात पार पडला आहे. पाच दिवसांच्या गणेश मूर्तीचं विसर्जन झाल्यानंतर काल 11 दिवसांच्या गणेशाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मात्र, मुंबईची शान आणि कोळीबांधवांचा नवसाचा राजा म्हणून ओळख असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन अद्यापही झालेले नाही. मुंबईत सुरु असलेली पावसाची रिपरिप आणि उसळलेल्या लाटांमुळे राजाचं विसर्जन करण्यात अडचणी येत असल्याचं म्हटलं जात आहे.
काल अनंत चतुर्दशी दिवशी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाला. दरवर्षी मुंबईतील मोठ्या आणि 11 दिवसांच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीला निघते. आणि त्याचं रात्री बऱ्याच मंडळातील गणपतींचे विसर्जन होते. तसेच लालबागच्या राजाचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी होते. मात्र, आज सकाळी आठ वाजता लालबागचा राजा मुंबईतील गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. 27 तास उलटले तरीही अद्याप त्याचे विसर्जन झालेले नाही. यावर्षी राजाच्या विसर्जनासाठी गुजरातवरून अत्याधुनिक तराफा मागवण्यात आला आहे. मात्र, समुद्रात भरतीची वेळ असल्याने राजाच्या विसर्जनात अडचणी निर्माण होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरती येऊन जात नाही तोपर्यंत लालबागच्या राजाचं विसर्जन होणार नाही आहे. ओहोटी येण्यासाठी आणखी 3 तासांचा अवकाश असल्यानं विसर्जन पुढे ढकलण्याची शक्यता आहे. दरम्यान नवा अत्याधुनिक तराफा आणि भरतीची वेळ ही दोन्ही कारणं विसर्जनाला अडथळे निर्माण करत आहेत. यंदा राजाच्या विसर्जनासाठी नवा आणि अत्याधुनिक स्वयंचलित तराफा मागवण्यात आला आहे. मागील वर्षीच्या तराफ्याच्या तुलनेत हा तराफा दुप्पट मोठा असून, तो पूर्णपणे स्वयंचलित आहे. यापूर्वी विसर्जनासाठी कोळी बांधवांच्या बोटींच्या मदतीने तराफा समुद्रात ओढून न्यावा लागत होता, पण आता या नव्या तराफ्यामुळे ती गरज भासणार नाही. या तराफ्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो पाण्यात 360 अंशामध्ये कुठेही वळण घेऊ शकतो, ज्यामुळे विसर्जनाची प्रक्रिया अधिक सोपी आणि सुरक्षित होईल.







