उद्घाटनाअभावी जुन्या जेट्टीवरूनच वाहतूक; मेरिटाईम बोर्डाने लक्ष देण्याची मागणी
। मुरूड । वार्ताहर ।
खोरा बंदरातील जुन्या जेट्टीला पर्याय म्हणून नव्या प्रवासी जेट्टीची उंची व लांबी वाढवण्यासाठी गृह व बंदर विभागाकडून नऊ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. जेट्टीला आवश्यक असणार्या सुविधा पुरविण्यासाठी अतिरिक्त निधी देण्यात आला होता. हे काम ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू करण्यात आले होते. सध्या जेट्टीचे हे काम पूर्ण झाले आहे, मात्र उद्घाटनाअभावी जेट्टीचे लोकार्पण रखडल्याने जुन्या जेट्टीवरूनच वाहतूक केली जात आहे. त्यामुळे मेरिटाईम बोर्डाकडून याकडे लक्ष देण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना सहज पोहोचता यावे, यासाठी राजपुरीच्या जेट्टीप्रमाणे खोरा बंदराचादेखील विकास करण्यात आला. सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करून खोरे बंदरातील जेट्टी बांधण्यात आली.
खोरा बंदरातील जुनी जेट्टी ही आखूड तसेच रुंदीसह उंचीलाही कमी होती. त्यामुळे ओहोटीच्या वेळी बोटींना किनारा गाठणे कठीण जात होते. त्यामुळे शासनाने सागरमाला योजनेअंतर्गत या जेट्टीची पुनर्बांधणी केली. याअंतर्गत जेट्टीची लांबी 150 मीटर करून उंची, रुंदी वाढवून विस्तारीकरण केले आहे. सुमारे 350 वर्षांपूर्वी बांधलेल्या जंजिरा किल्ल्यावर प्रतिवर्षी राजपुरी आणि खोरा बंदरातील जेट्टीवरून सहा ते सात लाख पर्यटक हजेरी लावतात. त्यामुळे मेरिटाइम बोर्डालाही मोठा महसूल मिळतो.किल्ल्यावर जाण्यासाठी वाहतूक कोंडी होऊ नये व पर्यटकांची दिरंगाई टाळण्यासाठी राजपुरी नवीन जेट्टी व खोरा बंदरातून पर्यटकांना किल्ल्यापर्यंत ने-आण करण्यासाठी जंजिरा पर्यटक वाहतूक संस्थेला नियुक्त करण्यात आले आहे. या जेट्टीचे काम पूर्ण झाल्यामुळे खोरा बंदरातून जंजिरा, पद्मदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
खोरा बंदराचा 60 टक्के भाग उंच डोंगरांच्या रांगामुळे सुरक्षित असून, वादळी वार्यापासून येथे नांगरून ठेवलेल्या नौकाही सुरक्षित राहतील, असा मेरिटाईम बोर्डाला विश्वास वाटतो, मात्र उद्घाटनाअभावी जेट्टीचे लोकापर्ण रखडल्याने जुन्या जेट्टीवरूनच वाहतूक केली जात आहे.
‘जेट्टी खुली करणार ’
खोरा बंदराच्या उद्घाटन कार्यक्रमाविषयी मेरिटाइम बोर्डचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांना विचारले असता ते म्हणाले की, परिसर स्वच्छता व वेअरिंग कोट पूर्ण झाल्यावर मॉन्सूनपूर्व जंजिर्यासह खोरा बंदर जेट्टीचे लोकार्पण एकाच वेळेस होतील, अशी माहिती त्यांनी दिली.