पालीतील नवीन बस स्थानकाच्या बांधकामास मुहूर्त मिळेना

धोकादायक स्थितीतील इमारत जमीनदोस्त, नागरिकांकडून पुनर्बांधणीची मागणी
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील जीर्ण आणि जर्जर झालेल्या बस स्थानकाची इमारत पाच महिन्यांपूर्वी पाडण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणी नवीन इमारतीच्या पुनर्बांधणीस अजूनही सुरुवात झालेली नाही. जुन्या इमारतीचा राडारोडा देखील तसाच ठेवण्यात आलेला आहे. बस स्थानक इमारती अभावी प्रवासी व परिवहन कर्मचार्‍यांची गैरसोय होत आहे.
अनेक वर्षे धोकादायक स्थितीतल्या बस स्थानकाची इमारत तोडून त्याठिकाणी नवीन इमारत उभी रहावी यासाठी नागरिकांकडून वारंवार राज्य परिवहन महामंडळाकडे मागणी करण्यात येत होती. यासाठी सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांकडून उपोषणे व आंदोलने देखील करण्यात आली. 2016 मध्ये रिपाइं रायगड जिल्हा सचिव रवींद्रनाथ यांनी नवीन बस स्थानकाकरिता आमरण उपोषण केले यावेळी त्यांच्या उपोषणाला व नागरिकांच्या मागणीला यश आले आणि पाली बस स्थानकाच्या नवीन इमारतीकरिता राज्य परिवहन महामंडळाकडून निधी उपलब्ध करण्यात आला. परंतु काही वर्षे जाऊन सुद्धा परिवहन महामंडळाकडून बस स्थानकाच्या पुनर्बांधणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यान रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी पुन्हा मार्च महिन्यात पाच दिवस उपोषण केल्यानंतर नवीन इमारत बांधण्यासाठी परिवहन महामंडळाकडून बस स्थानकाची धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्यात आली. परंतु 5 महिने उलटून गेले तरी परिवहन महामंडळ नवीन इमारतीच्या पुनर्बांधणी कडे कानाडोळा करतांना दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठा हिरमोड झाला आहे. स्थानक आवारात कर्मचारी व प्रवाशांसाठी तात्पुरती शेड उभारण्यात आली आहे. मात्र तेथे सर्वांची गैरसोय होतांना दिसते. शिवाय दुकानदारांचे देखील नुकसान होत आहे.

दुर्गंधी आणि गैरसोय
पाली बस स्थानक हे खाजगी वाहनांचे पार्किंगचे ठिकाण बनले आहे. बस स्थानकात मोठाले खड्डे पडले आहेत. बस स्थानकाच्या आवारात दूषित पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. या दूषित घाण पाण्यातून प्रवाशांना मार्ग काढावा लागतो. निवारा शेड देखील पूर्णतः दूषित पाण्यात आहे. परिणामी प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. प्रवाशांना शौचालयाची व्यवस्थित सोय नाही. मद्यपींमुळे स्थानक दारूचा अड्डा बनला आहे. स्थानकाजवळील नाल्यावरील एक स्लॅब तोडला असल्याने गाड्यांना प्रवेश करण्यास व बाहेर जाण्यास अडथळा निर्माण होतो. शिवाय या उघड्या नाल्यामुळे घाण व दुर्गंधी पसरते.

इमारत निधी मंजूर
नवीन बस स्थानक नुतानीकरणासाठी तब्बल 2 कोटी 36 लाखांचा निधी नोव्हेंबर-डिसेंबर 2019 मध्ये मंजूर झाला होता. यामध्ये नवीन सुसज्ज भव्य इमारतीसह विविध सुविधा आदींचा समावेश होता. तसेच इमारतीच्या प्रत्यक्ष बांधकामास जानेवारी 2020 पासून सुरुवात होणार होती. मात्र दीड वर्ष उलटूनही अजून एक वीटसुद्धा बसविण्यात आलेली नाही.

रायगड परिवहन विभागीय नियंत्रक यांच्याकडून बस स्थानकाचे तात्काळ पुनर्बांधणीचे लेखी पत्र देण्यात आले होते. परंतु आज 5 महिने उलटून गेले असून परिवहन महामंडळाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. कदाचित त्यांना आलेला निधी पाली बस स्थानकासाठी वापरायचाच नाही. परंतु लवकर बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू केले नाही तर पुन्हा एकदा आमरण उपोषणास बसणार आहे.
रवींद्रनाथ ओव्हाळ, रिपाइं रायगड जिल्हा सचिव

सदरची मोडकळीस आलेली बस स्थानकाची इमारत पाडण्यात आली आहे. लवकरच नवीन इमारतीच्या बांधकामास सुरुवात करण्यात येईल. पावसामुळे काम थांबले आहे. परंतु संबंधित ठेकेदारास लवकरात लवकर काम चालू करण्यास सांगितले आहे.
अनघा बारटक्के, परिवहन विभागीय नियंत्रक रायगड

Exit mobile version