ठेकेदाराला टाकले काळ्या यादीत
| सुधागड -पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पाली बसस्थानकाचे नूतनीकरण दोन वर्षांपासून रखडले आहे. ठेकेदाराने काम पूर्णपणे थांबविले असल्याने नुकतेच या ठेकेदाराला हटविले असून त्याला काळ्या यादीत देखील टाकण्यात आले आहे. त्याची अनामत रक्कम देखील रद्द करण्यात आली आहे. सद्यस्थितीत स्थानकाची प्रचंड दुरवस्था झाली असून स्थानकाला विविध समस्यांनी ग्रासले आहे.
बसस्थानकाची जुनी इमारत तोडून एक वर्ष उलटून गेले तरी देखील नवीन इमारत अजूनही बांधण्यात आलेली नाही. पाली बस स्थानक नूतनीकरण व विविध समस्यांसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ ओव्हाळ हे नियमित परिवहन मंडळाकडे उपोषण व निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
मागील महिन्यात कार्यकारी अभियंता राज्य परिवहन महामंडळ मुंबई प्रदेश, विद्या भिलारकर व परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक रायगड अनघा बारटक्के यांनी स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली. व जुन्या ठेकेदाराला हटवून नवीन निविदा काढणार असल्याचे सांगितले होते. आणि त्यानुसार ही प्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले आहे असे भिलारकर यांनी सांगितले.
स्थानकाचे नूतनीकरण व्हावे आणि तालुक्यातील जनतेला येथे उत्तम सोयीसुविधा मिळण्यासाठी गेली 4-5 वर्षांपासून संघर्ष करत आहे. यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले. आता जुन्या ठेकेदाराला हटवून पुन्हा निविदा काढण्यात येईल समाधान होत आहे.
रवींद्रनाथ ओव्हाळ
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, सुधागड
वाढीव निधी
कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात आले असून नव्याने निविदा बोलावणे व नवीन ठेकेदार नेमण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यास साधारण सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात कामाला सुरुवात होईल. तसेच चालू परिस्थितीनुसार निधी देखील वाढविण्यात येणार आहेत. सुरुवातीला 2 कोटी 36 लाखांचे असलेले एकूण काम आता साधारण साडे तीन ते साडेचार कोटींवर जाऊ शकते. मात्र आराखडा (प्लॅन) तोच राहणार आहे. असे विद्या भिलारकर म्हणाल्या.