| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याच्या विकासामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे योगदान अमूल्य असून, पक्षासोबत सदैव एकनिष्ठ राहणारे कार्यकर्ते हेच आपल्या पक्षाचे बळ आहे, तसेच विकासाची कामे रोखणारे आमदार जनतेला आवडत नाही, तर विकासाची कामे पुढे नेणारे आमदार लोकांच्या मनावर राज्य करतात, असे प्रतिपादन पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी नवगाव येथे आयोजित करण्यात मुख्य रस्ता उद्घाटनप्रसंगी आपल्या मनोगतात केले. तसेच यापुढे ग्रामीण भागातील किमान 50 टक्के विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिकून पुढे यावे, याकरितासुद्धा आपण प्रयत्नशील राहणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

नवगाव येथे आ. जयंत पाटील यांच्या माध्यमातून मुख्य रस्त्याच्या कामाचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने नवगाव ग्रामस्थांच्या माध्यमातून आ. जयंत पाटील आणि पाटील परिवाराचा भव्य सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी आ. पंडित पाटील, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, किशोर हजारे, संदीप घरत, सुरेश घरत, नलिनी बना, सतीश म्हात्रे, रोहिणी पाटील, प्रफुल्ल पाटील, मनोहर म्हात्रे, अशोक नाईक, तुकाराम लडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
अलिबाग तालुक्यातील अष्टागरांमधील नवगाव हे महत्त्वाचे बंदर आहे, जे कालही महत्त्वाचे होते आणि आजही आहे. नवगावसह येथील पंचक्रोशीमधील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आरसीएफ कंपनीवर काढलेला हंडामोर्चा असो, मीनाक्षी पाटील यांच्या मंत्रीपदाच्या कारकीर्दीमध्ये उभारलेला पूल, थेट समुद्रावर जाण्यासाठी तयार केलेला रस्ता आणि यामुळे मच्छिमारी व्यवसायाला झालेला आर्थिक फायदा, पंडित पाटील यांच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कारकीर्दीमध्ये प्रत्येक घरात नळ ते गावातील तरुणांना खेळाच्या माध्यमातून एकत्रित ठेवण्यासाठी चित्रलेखा पाटील यांचे योगदान यासह अनेक गोष्टींवर आमदार जयंत पाटील यांनी आपली मते मांडली, तसेच ज्यांना शेकापच्या माध्यमातून मोठे करण्यात आले, ते पुढे शेकापच्या विरोधात जाऊन लढले, त्यांनी येथील स्थानिक कार्यकर्त्यांना कधी विश्वासात घेतले नाही, त्यामुळे येथील कार्यकर्ते सदैव संभ्रमात राहिले. पण, या भागाचा विकास कालही शेकापच करीत होता आणि आजही शेकापच करतोय, यामुळे पुढील काळात शेकापच जिल्ह्यातील किंगमेकर पक्ष असेल, असेही आ. जयंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी शेकापच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करताना प्रभाकर पाटील, दत्ता पाटील, मीनाक्षी पाटील यांनी जो वारसा जपलेला आहे, तोच आपण, पंडित पाटील, आस्वाद पाटील पुढे नेत आहोत आणि त्यामध्ये थळ, नवगाव, किहीम, सासवने येथील कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे पक्षाला सदैव उभारणी देण्यासाठी एकनिष्ठ राहून काम केले, त्याबाबत त्यांनी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

यावेळी माजी आ. पंडित पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना आमदार म्हणून आपल्या कारकीर्दीमध्ये आपण नवगाव गावातील रस्ते, पाणी आणि मच्छिमार यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव पुढाकार घेऊन काम केले आणि त्यामुळे नवगावनेदेखील मला भरभरून मते दिली, याबद्दल आभार व्यक्त केले. शिवाय, मच्छिमारी व्यवसाय आता पुढे गेला पाहिजे आणि अधिक यांत्रिकीकरण होत असताना आपण आपला व्यवसाय मोठा झाला पाहिजे, तो टिकला पाहिजे यासाठी सजग राहिले पाहिजे, याबाबत नागरिकांना आवाहन केले. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण नवगावमध्ये सातत्याने आरसीएफ प्रशासनासोबत ज्या सभा घेतल्या, प्रसंगी आक्रमक भूमिका घेतली, त्यामुळे या लढ्याला यश मिळाले याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले, तसेच पाटील परिवाराचा एकत्रित सत्कार केल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. संदीप जगे यांनी केले.
चित्रलेखा पाटील यांचा विशेष सन्मान
कार्यक्रमामध्ये चित्रलेखा पाटील यांनी गावातील नागरिकांचा विजेचा प्रश्न सोडविल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. तसेच गावातील पाटील म्हणून कार्यरत असणारे फिडी कटोर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच विवेक लडगे, गोविंद हामणे, सुधीर सखे, प्रकाश जैतू, अनिल सखे, बद्रीनाथ मोहिते, हाशा रोगे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.