ऑलिंपिकमधील क्रिकेटचा समावेश लांबणीवर?

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

क्रिकेटसह नऊ खेळांच्या ऑलिंपिकमधील समावेशाचा निर्णय आता लांबणीवर गेला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता नऊ खेळांपैकी कोणत्या खेळांना 2028 मध्ये लॉस एंजिलिस येथे होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये स्थान मिळेल याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.

लॉस एंजिलिस आयोजक व आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती यांच्यामध्ये या आठवड्यात बैठक होणे अपेक्षित होते, पण आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडून ही बैठक पुढे ढकलण्यात आली. तसेच आयोजक व समिती यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचेही समोर आले आहे. महत्त्वाची बैठक पुढे ढकलण्यात आल्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडून नियुक्त करण्यात आलेल्या पॅनेलला क्रीडा प्रोगाममधील बदल व खेळांबाबत माहिती गोळा करून कोणत्या खेळांचा समावेश करायचा याबाबत शिफारसही करण्यात आलेली नाही. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती सदस्यांची बैठक या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 15 ते 17 रोजी मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीत या खेळांच्या भवितव्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

नऊ खेळ शर्यतीत
लॉस एंजिलिस ऑलिंपिकमध्ये समाविष्ट होण्यासाठी नऊ खेळ शर्यतीत आहेत. यामध्ये क्रिकेटसह बेसबॉल-सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅकरोस, ब्रेकिंग, कराटे, किकबॉक्सिंग, स्क्वॉश व मोटारस्पोर्ट्‌‍स या खेळांचा समावेश आहे.
बॉक्सिंग, वेटलिफ्टिंगच्या भवितव्याबाबत चिंता
बॉक्सिंग, मॉडर्न पेंटॅथलॉन व वेटलिफ्टिंग या तीन खेळांच्या ऑलिंपिकमधील भवितव्याबाबतही चिंता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती 2024 मधील पॅरिस ऑलिंपिकनंतर या खेळांचा समावेश कायम ठेवायचा का, याबाबत विचार करीत आहे.
Exit mobile version