दिल्लीचा गुजरातवर विजय

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

दिल्ली कॅपिटल्सने गुजरातचा 5 धावांनी पराभव करत आपला तिसरा विजय मिळवला. गुजरातकडून हार्दिक पांड्याने नाबाद 59 धावा केल्या तर राहुल तेवतियाने 7 चेंडूत 20 धावा चोपून दिल्लीचे टेन्शन वाढवले होते. तत्पूर्वी, गुणतक्त्यामध्ये अव्वल असणार्‍या गुजरात टायटन्सविरूद्ध दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांना 20 षटकात 8 बाद 130 धावांपर्यंतच मजल मारता आली. गुजरातकडून मोहम्मद शमीने 4 षटकात 11 धावा देत 4 बळी टिपले. अखेर अमन हकीम खानने 51 धावांची अर्धशतकी तर अक्षर पटेलने 27 धावांची खेळी करत दिल्लीची लाज वाचवली. दिल्लीकडून मोहित शर्माने देखील 2 बळी टिपले.

हार्दिक पांड्या आणि अभिनव मनोहर यांनी पाचव्या गड्यासाठी 62 धावांची भागीदारी रचली. गुजरात शंभरीच्या जवळ पोहचला असतानाच खलीलने अभिनव मनोहर 26 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. दरम्यान, एक बाजू लावून धरलेल्या हार्दिक पांड्याने अर्धशतक ठोकले होते. त्याच्या जोडीला आता राहुल तेवतिया आला होता. मात्र गुजरातला 12 चेंडूत 33 धावांची गरज होती. सामना तसा अवघड होता. मात्र आईस मॅन राहुल तेवतियाने 19 वे षटक टाकणार्‍या नॉर्त्जेच्या शेवटच्या तीन षटकात तीन षटकार ठोकले. या षटकात तब्बल 21 धावा झाल्या. आता सामना 6 चेंडू आणि 12 धावा असा होता.

अनुभवी इशांत शर्माने शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने पहिल्या चेंडूवर 2 दुसर्‍या चेंडूवर 1 धाव दिली. तिसरा चेंडू निर्धाव टाकला. तर चौथ्या चेंडूवर राहुल तेवतियाला बाद केले. आता सामना 2 चेंडूत 9 धावा असा आला. मात्र इशांतने पाचव्या चेंडूवर 2 धावा दिल्या. आता 1 चेंडू आणि 7 धावा असे इक्वेशन आले होते. राशिद खान स्ट्राईकवर होता. मात्र राशिदला फक्त दोन धावा करता आल्या आणि इशांतने दिल्लीचा विजय साकार केला.

गुजरातने दिल्लीला 130 धावांमध्ये गुडाळले खरे मात्र दिल्लीने देखील झुंजारपणा दाखवत गुजरातची हवा टाईट केली होती. त्यांनी गुजरातची अवस्था 3 बाद 26 धावा अशी करून ठेवली होती. खलील अहदमने वृद्धीमान साहाला शुन्यावर नॉर्त्जेने शुभमन गिलला 6 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या विजय शंकरचा इशांत शर्माने 6 धावांवर असताना त्रिफळा उडवला. यानंतर डेव्हिड मिलरही भोपळाही न फोडता माघारी परतला. त्याचा कुलदीप यादवने त्रिफळा उडवत गुजरातची अवस्था 4 बाद 32 धावा अशी अवस्था केली. मोहम्मद शमीने दिल्लीची अवस्था 5 बाद 23 धावा अशी केल्यानंतर अक्षर पटेल आणि अमन हकीम खान यांनी सहाव्या गड्यांसाठी अर्धशतकी भागीदारी रचत दिल्लीची लाज वाचवण्याचा प्रयत्न केला. ही जमलेली जोडी शतकी मजल मारून देणार असे वाटत असतानाच मोहित शर्माने 30 चेंडूत 27 धावा करणार्‍या अक्षर पटेलला बाद केले.

अक्षर बाद झाल्यानंतर अमनने डावाची सूत्रे आपल्या खांद्यावर घेत दिल्लीला शतकी मजल मारून दिली. त्याला रिपल शर्माने आक्रमक साथ दिली. दरम्यान, त्याने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. मात्र अर्धशतकानंतर (51) राशिद खानने त्याचा अडसर दूर करत दिल्लीला 126 धावांवर 7 वा धक्का दिला. यानंतर डावाचे शेवटच्या षटकात मोहित शर्माने चांगले स्लोअर वन टाकत फक्त 3 धावा दिल्या. त्याने रिपल शर्माला 23 धावांवर बाद करत आपल्या बळींचे शतकही पूर्ण केले. गुणतालिकेतील तळात असलेल्या दिल्लीचा उरला सुरूला आत्मविश्‍वास आज मोहम्मद शमीने घालवून टाकला. गुजरातने दिल्लीला पहिल्या 5 षटकात 5 धक्के दिले. यातील 4 विकेट्स एकट्या मोहम्मद शमीने घेतल्या. तर कर्णधार डेव्हिड वॉर्नर 2 धावा करून धावबाद झाला. शमीने सॉल्टला पहिल्या चेंडूवर शुन्यावर बाद केले. त्यानंतर रिले रूसोला 8 तर मनिष पांडेला 1 धावेवर बाद केले. पाठोपाठ पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्रियम गर्गला 10 धावांवर बाद करत आपली चौथी शिकार केली. शमीने दिल्लीची अवस्था 5 षटकात 5 बाद 23 धावा अशी केली.

Exit mobile version