दिल्लीचा मुंबईवर विजय

। अबूधाबी । वृत्तसंस्था ।
चौदाव्या इंडियन प्रीमियर लीग हंगामात शनिवारी अपेक्षेनुसार ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने पाच वेळच्या विजेत्या, पण सध्या संघर्षरत मुंबई इंडियन्सवर 5 चेंडू शिल्लक ठेवीत 4 गड्यांनी विजय नोंदविला. मुंबई इंडियन्सने 8 बाद 129 धावा केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 19.1 षटकांत 6 बाद 132 धावा काढून आपला विजय साकार केला. या विजयाबरोबरच दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्जचे प्रत्येकी 18 गुण झाले असून, सरस धावगतीच्या जोरावर गुणतालिकेत चेन्नईचे अव्वल, तर दिल्लीचे दुसरे स्थान कायम राहिले. या विजयाबरोबरच दिल्लीनेही चेन्नईपाठोपाठ प्ले-ऑफमध्ये आपले स्थान सुनिश्‍चित केले आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरविताना दिल्लीच्या गोलंदाज फिरकीपटू अक्षर पटेल व वेगवान गोलंदाज आवेश खानने जबरदस्त कामगिरी करून मुंबईला अल्पधावसंख्येत रोखले व आपल्या दिल्लीच्या विजयाचा मार्ग सोपा केला. अक्षर व आवेशने प्रत्येकी 3 बळी टिपले. मुंबईकडून सूर्यकुमार यादवला सूर गवसला व त्याने 26 चेंडूत 2 चौकार व 2 षट्कारांह सर्वाधिक 33 धावांची भर घातली. रोहित शर्मासह क्विंटन डिकॉक, सौरभ तिवारी, पोलार्ड, हार्दिक पांड्या दिल्लीच्या गोलंदाजांसमोर फार वेळ टिकाव धरू शकले नाही. धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या डावाची सुरुवातही निराशाजनक झाली, पृथ्वी शॉ (6), शिखर धवन (8) व स्टीव्ह स्मिथ (9) हे भरवशाचे खेळाडू लवकरच बाद झाले, परंतु कर्णधार ऋषभ पंत व माजी कर्णधार श्रेयस अय्यरने लौकीकास साजेशी खेळी करीत आपल्या संघाचा विजय साकर केला. पंतने 22 चेंडूंत 26 धावांची खेळी केली. श्रेयसने नाबाद 33 धावांची, तर आर. अश्‍विनने नाबाद 20 धावांची खेळी करीत दिल्लीला विजय मिळवून दिला.

Exit mobile version