जगावर ‘डेल्टा’चे संकट

132 देशांमध्ये प्रादुर्भाव, लस घेतलेल्या व्यक्तींनाही संसर्ग
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मूळ कोरोना विषाणूपेक्षा घातक आणि अधिक वेगाने प्रादुर्भाव होणार्‍या ‘डेल्टा’चा अमेरिका, चीनसह 132 देशांमध्ये फैलाव झाला आहे. सर्वाधिक संसर्गजन्य असलेल्या डेल्टा विषाणूमुळे कोरोनाविरोधातील लढ्याचे स्वरूप बदलले आहे, असे अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल’ने (सीडीसी) स्पष्ट केले आहे.
‘डेल्टा’मुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या अनुषंगाने स्पष्ट संदेश प्रसारित करणे, आरोग्य कर्मचार्‍यांवर लसीकरणाची सक्ती आणि मुखपट्टीचा वापर या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब पुन्हा एकदा करण्याची आवश्यकता ‘सीडीसी’ने अधोरेखित केली आहे.

लसीकरण झालेल्या व्यक्तीनाही डेल्टाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याने प्रतिबंधात्मक उपाय वाढवण्याची, ते आणखी कठोर करण्याची आवश्यकताही अहवालात अधोरेखित केली आहे. आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरण सक्तीचे करण्याबरोबरच सर्वांनी मुखपट्टी वापरण्यास सुरुवात करावी, असेही सुचवण्यात आले आहे.

डेल्टा विषाणू घातक असून त्यामुळे मृत्युदर आणि रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण वाढत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस घेब्रेसस यांनी म्हटले आहे, तर लशीही गंभीर आजार रोखण्यात फारशा प्रभावी ठरताना दिसत नाहीत, अशी चिंता जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन तज्ज्ञ माईक रायन यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version