रुग्णालयातील बाउन्सरवर कारवाईची मागणी

। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यामध्ये विविध रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांवर धाक ठेवण्यासाठी शहरातील काही रुग्णालयांबाहेर बाउन्सर तैनात असल्याचे चित्र दिसून येते. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

उपचारादरम्यान एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णालय व्यवस्थापक तात्काळ बाऊन्सरना पाचारण करतात. अनेकदा बिल अदा करण्यासाठी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकरांना डांबून ठेवल्याच्या तक्रारी घडल्या आहेत. पनवेल तालुक्यातील अनेक रुग्णालयांमध्ये महात्मा फुले योजना किंवा आयुष्यमान भारत योजनांमधून गरजुंना उपचार केले जात नसून अनेक तक्रारी धर्मदाय आयुक्तांकडे व संस्थांकडे करण्यात आल्या आहेत.

अनेक रुग्णालयांमध्ये बाउन्सर ठेवण्यात येत असल्यामुळे अशा बाउन्सर ठेवणार्‍या रुग्णालयांवर खंडणीचा, दमदाटीचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Exit mobile version