मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाईची मागणी

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

रत्नागिरी ते पावस या सागरी मार्गावर मोकाट जनावरांच्या वावरामुळे वाहन चालकांना हा रस्ता धोकादायक ठरत आहे. यामुळे हा परिसर दिवसेंदिवस अपघात क्षेत्र बनत आहे. तसेच, मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक व वाहनचालकांकडून जोर धरत आहे.

फणसोप, कसोप, कुर्ती, मागलाड, कोळंबे, गोळप या गावातील अनेक शेतकर्‍यांकडे मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. पूर्वी या जनावरांच्या पाठीवर गुराखी असायचे; परंतु सध्या ही पद्धत बंद झाल्यामुळे जनावरांना माळरानावर सोडले जाते. गावठाण भागामध्ये आंबा कलमांच्या जागा असल्यामुळे त्या बंदिस्त असतात. यामुळे रत्नागिरी ते पावस या कातळ सड्यावर जनावरे सोडली जातात. दिवसभर रानात चरून रात्रीच्या वेळी ही जनावरे रस्त्यावर ठाण मांडतात. याचा त्रास या मार्गावरून जाणार्‍या दुचाकी वाहनांना मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे या मार्गावर अनेक छोटे मोठे अपघात घडत असतात.

काही महिन्यांपूर्वी नाखरे गावात मोकाट जनावरांपासून होणार्‍या त्रासापासून वाचवण्यासाठी ग्रामसभेमध्ये ठराव करण्यात आला होता. ज्या मालकांची जनावरे आंबा बागायतदार व अन्य शेतीचे नुकसान करतील त्या मालकांवर कारवाई करण्याचे आदेश ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे या मार्गावरील प्रत्येक ग्रामपंचायत याबाबत ठोस निर्णय घेऊन जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Exit mobile version