| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील पत्रकारांना वृत्त संकलन करण्यासाठी उरण नगर परिषदेच्या प्रशासकीय भवनात स्वतंत्र दालन उपलब्ध करून देण्यात यावे, या मागणीसाठी उरण तालुका दैनिक पत्रकार संघाच्यावतीने नगराध्यक्षा भावना घाणेकर यांना मंगळवारी (दि.6) पत्रकार दिनाचे औचित्य साधत, लेखी निवेदन देण्यात आले आहे.
जागतिक स्तरावरील जेएनपीए अंतर्गत असलेली बंदरे तसेच विविध शासकीय निमशासकीय प्रकल्प व वाढत्या औद्योगिकीकरणामुळे उरणची ओळख आता जगाच्या नकाशावर होऊ लागली असताना, उरण नगरपरिषदही अपवाद नाही. त्यामुळे उरण नगरपरिषदेच्या होणाऱ्या सर्वसाधारण सभा, बैठका व अन्य कार्यक्रमांवर भविष्यात सर्वांचेच लक्ष वेधून राहाणार आहे. त्या अनुषंगाने नगरपरिषदेच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी विविध घडामोडी व कामकाजाचे विविध वृत्तपत्रातून, वृत्तांकन होणे देखील काळाची गरज आहे. उरण परिसरात वृत्त संकलन करण्यासाठी राज्य, जिल्हा, स्थानिक वृत्तपत्र तसेच इतर विविध माध्यमातही अनेक पत्रकार कार्यरत आहेत. त्यांना नगर परिषदेच्या प्रशासकीय भवनात दालन उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी उरण तालुका दैनिक पत्रकार संघामार्फत नगराध्यक्षा भावना घाणेकर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.







