| पनवेल | प्रतिनिधी |
सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली ते कामोठे यादरम्यान विद्यार्थी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्कायवॉक उभारण्याची मागणी जोर धरत आहे. याबाबत नगरसेवक विजय मनोहरशेठ खानावकर यांनी पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांना निवेदन सादर केले आहे.
सदर महामार्ग हा अत्यंत वर्दळीचा असून, येथे सतत मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरू असते. कळंबोली, रोडपाली व कामोठे परिसरातील नागरिक, विद्यार्थी, कामगार तसेच प्रवासी यांना रस्ता ओलांडताना जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सुरक्षित पादचारी मार्ग नसल्यामुळे अपघाताचा धोका कायम असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
कळंबोली मॅकडोनल्ड येथील बस थांब्याचे स्थलांतर कामोठा केएलई कॉलेज या ठिकाणी करण्यात आल्यामुळे वाहतुकीवरील ताण वाढला आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्ता ओलांडणाऱ्या प्रवाशांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असूनही स्कायवॉक नसल्याने प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. त्यामुळे कळंबोलीतील केएलई कॉलेजपासून कामोठ्यापर्यंत स्कायवॉक उभारणे ही काळाची गरज असल्याचे नगरसेवकांनी नमूद केले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर संबंधित पादचारी पूल (स्कायवॉक) उभारणीचे काम लवकरात लवकर मंजूर करून सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.






