मुख्याधिकारी नेहा भोसले यांना निवेदन
| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील साधारण पंचवीस ते तीस गाव-खेड्यांसाठी महत्त्वाची बाजारपेठ व शहरवजा गाव असलेल्या बोर्लीपंचतन येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रशस्त इमारत आहे. या आरोग्य केंद्रावर अवलंबून असलेल्या बोर्ली पंचक्रोशीतील रुग्णांची संख्या मोठी आहे. या केंद्रात असणारी रिक्त पदे, कार्यक्षेत्राबाहेरील येणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या, प्रसुतीसाठी येणाऱ्या महिला त्याबरोबरच दिघी सागरी पोलीस ठाण्यामधील न्याय वैद्यकीय प्रकरणांना प्राधान्याने वेळ द्यावा लागत असल्याने याचा आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने येथील उपचारावर सुद्धा मर्यादा येतात. त्यामुळे रात्री, अपरात्री गरोदर महिला, विंचू व सर्पदंश रुग्ण, अपघातग्रस्त तसेच आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांना पुढील उपचारासाठी 17 किलोमीटरवरील श्रीवर्धन ग्रामीण रुग्णालय किंवा 55 किलोमीटरवरील माणगाव उपजिल्हा रुग्णालयात जावं लागतं. अशा परिस्थितीत वेळेत उपचार न मिळाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होते. इथल्या गोरगरीब जनतेला तज्ञ डॉक्टरांची सेवा मिळत नसल्याने त्यांना पनवेल, मुंबई, पुणे या ठिकाणी जाऊन ऐपत नसतानाही नाईलाजाने कर्ज काढून महागडी सेवा घ्यावी लागते.
या विभागात सुसज्ज रुग्णालय होण्यासाठी पत्रकारांनीसुद्धा वेळोवेळी आवाज उठविला. या विषयाबाबत श्रीवर्धन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय कळस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मिंटिंगमध्ये उपाध्यक्ष विजय कांबळे, सचिव गणेश प्रभाळे, खजिनदार मकरंद जाधव, सदस्य सर्फराज दर्जी, रमेश घरत, मुजफ्फर अलवारे यांच्या उपस्थितीमध्ये ठराव केला. त्या अनुषंगाने पत्रकार मकरंद जाधव व विजय कांबळे यांनी नुकतेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची भेट घेऊन त्यांच्याजवळ चर्चा केली व लेखी निवेदन देऊन याबाबत सहकार्य करण्याची विनंती केली. नागरिकांना भेडसावणाऱ्या या आरोग्यविषयक गंभीर समस्येवर मार्ग काढण्याचे आवाहन श्रीवर्धन तालुका पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात येत आहे.
