प्रशासनाचे दुर्लक्ष, जनतेमध्ये संतापाची भावना
। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. यावर्षी मुसळधार पावसामुळे रुग्णालयाला आणखी मोठी गळती लागली आहे. मात्र, गळक्या इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.तालुक्यातील बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत दिघी, कुडगाव, वेळास, आदगाव, सर्वे, नानवली, वडवली, शिस्ते, दिवेआगर, वांजळे, खुजारे, बोर्लीपंचतन परिसरातील 35 गावांना तसेच जवळपासच्या खेड्यापाड्यातील गरोदर महिला, बालक, अपघातग्रस्तांना उपचारासाठी याच केंद्रावर अवलंबून राहवे लागते. त्यामुळे हे केंद्र या गरीब जनतेसाठी संजीवनी आहे. येथील जनतेला 17 ते 30 किमींचा प्रवास करून तालुक्याच्या ठिकाणी उपचारांसाठी जाणे शक्य होत नाही. परंतु सदर केंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली असून जनतेमध्ये संतापाची भावना आहे.
या आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या अनेक ठिकाणी स्लॅबचा भाग कोसळल्याने पावसाळ्यात सर्वत्र पाणी साचते. याशिवाय छतावरील सिंमेटचे पत्रे उडून गेल्याने सोलर सिस्टीम उभारलेली ही यंत्रणा धुळीस मिळाली आहे. औषध असणार्या खोलीच्या खिडक्या नाहीशा झाल्या आहेत. प्रसृतीगृहाच्या बाजूला पहिल्या मजल्यावरील जाणारा जिण्याचा काही भाग कोसळला असल्याने अवस्थाही बिकट आहे. तसेच इमारतीच्या पहिला मजल्यावर पाणी साचल्याने घाणीचे साम्राज्य वाढून येथील आरोग्यच धोक्यात आलं आहे.
रुग्णांना श्रीवर्धनपर्यंत जाणे शक्य नाही. म्हणूनच बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा मिळणे गरजेचे आहे. मात्र, सद्या केंद्राच्या इमारतीची अवस्था खूपच बिकट झाली आहे. स्लॅब गळणे, कुठे छतावर पत्रेच नाहीत. अशाने सदर इमारतीची मोठी दुरवस्था झाली आहे.
सूर्यकांत तोडणकर, बोर्लीपंचतन