| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये जिओ मोबाईल सेवेचे पूर्णपणे तीनतेरा वाजले आहेत. दिवसातून जिओ मोबाईलची सेवा अनेक वेळा खंडित होत असल्यामुळे ग्राहकांमधून मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. जिओ मोबाईलची सर्वोत्तम सेवा असल्यामुळे अनेक ग्राहकांनी जिओची सिमकार्ड खरेदी केली आहेत. तर, जिओचे 5जी नेट देखील चांगल्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने बऱ्याच जणांनी आपल्या नेटच्या वापरासाठी देखील जिओ मोबाईलची निवड केलेली आहे. परंतु, मागील दोन ते तीन महिन्यांपासून जिओ मोबाईलच्या सेवेमध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड होत असल्याने ग्राहकांमध्ये जिओ मोबाईलच्या खराब सेवेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिओचे नेटवर्क वारंवार गायब होत असल्यामुळे अनेकांचे व्यवहार ठप्प होत आहेत. तर, जिओ मोबाईलचे सिम कार्ड वापरणारे सर्वाधिक ग्राहक असल्यामुळे अनेकांना आपल्या कुटुंबियाजवळ किंवा नातेवाईकांजवळ संपर्क साधणे कठीण होऊन बसत आहे. तरी जिओ मोबाईल कंपनीने आपल्या सेवेमध्ये तातडीने सुधारणा न केल्यास ग्राहकांकडून अन्य कंपन्यांमध्ये आपली सिम पोर्ट करण्याचा कल वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील अनेक नागरिक कामधंद्या निमित्त प्रदेशात राहत असतात. जिओचे मोबाईल नेटवर्क गायब झाल्यामुळे परदेशातून या ठिकाणी संपर्क साधता येत नाही. तर, या ठिकाणच्या नातेवाईकांना परदेशात देखील संपर्क साधता येत नाही. त्यामुळे जिओचे सिम वापरणाऱ्या ग्रहांची मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे.







