| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी परिसरातील मौजे अंबिवलीतर्फे तुंगारतान येथे अज्ञात व्यक्तींमार्फत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर माती उत्खनन सुरू असून, त्यासाठी ओव्हरलोड डंपरद्वारे वाहतूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच उत्खननासाठी वापरण्यात येणारी काही जेसीबी यंत्रे नंबर प्लेटशिवाय कार्यरत आहेत.
माती वाहतूक प्रामुख्याने सायंकाळपासून उशिरा रात्रीपर्यंत केली जात असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळेस भरधाव वेगाने धावणाऱ्या ओव्हरलोड डंपरमुळे अपघाताची शक्यता वाढली असून, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. एमआयडीसी रस्त्यावर गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला सायंकाळी फिरण्यासाठी येत असतात तसेच शाळा व क्लास संपल्यानंतर लहान मुले या रस्त्याने प्रवास करीत असतात. अशा परिस्थितीत भरधाव व ओव्हरलोड डंपर वाहतुकीमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओव्हरलोड डंपरमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी होत असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच नंबर प्लेट नसलेल्या जेसीबी यंत्रांमुळे संबंधित वाहनांची ओळख पटविणे कठीण होत आहे.
बेकायदेशीर उत्खननामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली असून, नैसर्गिक जलप्रवाहात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या शेती जमिनीचे नुकसान होत असून, मातीची धूप वाढत आहे. भविष्यात यामुळे ग्रामस्थांच्या जीवित व मालमत्तेलाही धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी मौजे आंबिवली ग्रामस्थांनी तहसिलदार खालापूर यांच्याकडे अर्ज करताच ग्राम महसूल अधिकारी बलभिम लाटे, महसूल मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडकर यांनी घटनास्थळी जावून भेट दिली व पंचनामा करून कारवाई सुरू केली आहे. तरी संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
माती उत्खननावर कारवाईची मागणी
