| चिरनेर | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या पाच डॉक्टरांचे घरभाडे व व्यवसाय रोध भत्ता अलीकडेच बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नखाते यांनी संबंधित डॉक्टर केंद्रावर राहत नसल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात पाठवल्यामुळे ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, ते नेमून दिलेल्या ठिकाणी सेवा बजावत असून, त्यांच्यावर झालेली कारवाई अन्यायकारक आहे. दरम्यान, या प्रकरणाची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच सत्य बाहेर येईल, अशी मागणी नागरिकांनीही केली आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुका आरोग्य अधिकारी स्वतः पेण येथे वास्तव करत नसल्याच्या आणि अनेकदा वेळेवर उपस्थित नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. तसेच, डॉ. नखाते यांची पत्नी सध्या निलंबित असून, त्यांच्याशी संबंधित प्रकरणात हस्तक्षेप किंवा प्रभाव टाकण्याच्या दृष्टीने कामकाज होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हे फक्त आरोप असून, त्याची पुष्टी सरकारी स्तरावर झालेली नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी या सर्व प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून वास्तविकता स्पष्ट करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.







