। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानकरांची जीवनवाहिनी, माथेरानकरांची राणी अशी ख्याती प्राप्त झालेली अमन लॉज स्टेशन ते माथेरान स्टेशन दरम्यान धावणार्या माथेरान मिनिट्रेन शटल सेवेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी आत्ता सर्व स्तरातून केली जात आहे.
माथेरान टॅक्सी स्टँड ते बाजारपेठ दरम्यान अडीच ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत प्रवासाची दमछाक कमी व्हावी या करिता आणि याच दरम्यान माल वाहतुकीसाठी पण सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी अमन लॉज ते स्टेशन दरम्यान नागरिकांच्या प्रयत्नातून शटल सेवा सुरू करण्यात आली होती. ही सेवा ऊन पावसात देखील अविरतपणे सुरू आहे परंतु मागील तीन वर्षांपासून बंद असलेली सेवा आत्ताच काही दिवसांपासून सुरू करण्यात आली. पण नेरळ-माथेरान मिनिट्रेन सेवा सुरू होताच येथे नियमित सुरू असलेल्या शटल सेवेच्या वेळापत्रकात मात्र बदल करण्यात आला आहे.
हे नविन वेळापत्रक पर्यटकांना आणि नागरिकांना सोईचे नसून या शटल सेवेच्या फेर्यांमध्ये तब्बल दोन-दोन तासाचे अंतर आहे. यामुळे येथे येणार्या हौशी पर्यटकांचा व येथील नागरिकांचा वेळे अभावी हिरमोड होत आहे. याकरिता अनेक राजकीय पक्षांमार्फत तसेच येथील व्यापारी संघटनेच्या वतीने रेल्वे प्रशासनाला शटल सेवा वेळापत्रक संदर्भात बदल करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. शटल सेवेचे जुने वेळापत्रक योग्य असून त्या प्रमाणेच गाड्या चालविण्यात याव्या असे स्थानिकांमधून बोलले जात आहे.