| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावाला पर्यायी मार्ग म्हणून महत्वाचा ठरू शकणाऱ्या माणगाव ते दामत फाटा या मार्गाचे काँक्रीटीकरण राज्य सरकारने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन मानवाधिकार संस्थेने दिले आहे. या पेशवे काळातील रस्त्याच्या मजबुतीकरणाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने आज हा पर्यायी मार्ग वाहनांसाठी बंद होण्याच्या मार्गवर आहे.
आंबिवली रेल्वे गेट ते दामत रेल्वे गेट पेशवाई मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे कळायला मार्ग नाही. दरम्यान, या रस्त्यावर आतापर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात घडले असून काहींना आपला प्राण देखील गमवावा लागलेला आहेत. तसेच, रात्री या रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे बनल्याने या रस्त्याचा वापर गुन्हेगारी प्रवृत्तीचे चोर करू लागल्याचे समोर आले होते. हा जोड रस्ता अनेक गावांना जोडणारा असून महत्वाचा दुवा मानला जात असताना देखील रस्त्यावर शासनाचे दुर्लक्ष का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
या रस्त्याबाबत अधिकारी वर्गाला सूचना केल्यानंतर देखील रस्त्याचे काम केले जात नाही. कर्जत आणि कल्याण, कशेळे राज्य मार्ग तसेच माथेरान कळंब राज्य मार्ग यांच्यासाठी पर्यायी समाजाला जाणाऱ्या या रस्त्यामुळे नेरळ गावातील सर्व वाहतूक आटोक्यात येऊ शकते. त्यामुळे शासनाने या रस्त्याची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता बनवावा, अशी मागणी केली आहे.
सडक योजनेतून रस्ता बनविण्याची मागणी
