लहान मूलांचे शोषण करणार्‍या कोळसा भट्टी मालका विरुध गुन्हा दाखल करण्याची मागणी

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील 13 वर्षीय आदिवासी मुलगी व इतरही काही मुलांना कोंडून त्यांच्याकडून काम करून घेणार्‍या सोलापूर जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोनवडी गावातील कोळसाभट्टी मालकावर पाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करा अशी मागणी सर्वहारा जनआंदोलन संस्थेतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन सर्वहारा जनआंदोलन संस्थेतर्फे रायगड पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.
तालुक्यातील गायमाळ आदिवासीवाडी येथील नामदेव वालेकर यांची 13 वर्षाची मुलगी अंजना वालेकर ही आपल्या कुटूंबियांबरोबर सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यातील वाझर या गावी कोळसाभट्टी कामाकरीता ऑगस्ट 2021 रोजी गेली होती. कोळसाभट्टी मालक अहमद शेख हा अंजना वालेकर हिच्यासोबत आदिवासी समाजाच्या 7 ते 8 मुलांना शेतीची कामे, गुरे बकरी राखणे, शेण काढायला लावणे अशी कामे करून घेऊन बालकामगार म्हणून त्यांचे शोषण करत आहे. या मुलांना गेली कित्येक महिन्यापासून कारखानदाराच्या अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. या कोळसाभट्टी मालका विरुद्ध नामदेव वालेकर यांनी सर्वहारा जनआंदोलन या संस्थेकडे लेखी स्वरूपात तक्रार केली. लहान मुलांना साधारणतः 3 ते 10 वर्षापर्यंत शिक्षणाची आवड निर्माण होऊन गोडी लागते. मात्र ही मुले बालवयात कामाला जुंपली की त्यांचे भवितव्य धोक्यात येते, अशाप्रकारात सध्या मोठी वाढ होत असून बालशोषण थांबावे यासाठी सर्वहारा आंदोलन संघटनेने पुढाकार घेतला आहे.
असे कृत्य करणारे कोळसाभट्टी मालक शेख यांचे विरूद्ध पाली सुधागड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सदर लहान मुलीस इतर लहान मुलांना शेख याचे ताब्यातुन सोडवण्यात यावे असे निवेदन सर्वहारा जनआंदोलन संस्थापिका उल्का महाजन, सोपान सुतार, चंद्रकांत गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.

Exit mobile version