मकर संक्रांतीसाठी हलव्याच्या दागिन्यांना मागणी

| पनवेल | प्रतिनिधी |

मकरसंक्रांत जवळ आली की महिलांना वेध लागतात ते संक्रांतीच्या हळदीकुंकू समारंभाचे. तर नववधूंना प्रतीक्षा असते ती पहिल्या संक्रांत सणाची. त्यासाठी हलव्याच्या दागिन्यांचा साज केला जातो. अवघ्या काही दिवसांवर मकरसंक्रांतीचा सण आला आहे. त्यासाठी हलव्याच्या दागिन्यांना मागणी वाढल्याचे दिसून येत आहे.

लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला मुलीच्या सासरी संक्रांत सणाचे वाण घेऊन जाण्याची प्रथा विविध शहरांमध्ये आहे. यासाठी हलव्याचे विविध दागिने घेण्यासाठी पनवेल शहरातील व परिसरातील विविध दुकानांमध्ये हलव्यांचे दागिने विक्रीस उपलब्ध झाले आहेत. हलव्यापासून तयार करण्यात येणाऱ्या दागिन्यांमध्ये मंगळसूत्र, बांगड्या, तनमणी, कुड्या, राणीहार, हार, अंगठी, बाजूबंद, तोडे, शाहीहार, चापाची नथ यासारखे महिलांच्या दागिन्यांचे विविध सेट उपलब्ध आहेत. महिलांप्रमाणे नवविवाहीत पुरुषांसाठीही हार, गुच्छ, पेन, मोबाइल केस, घड्याळ तसेच पाच प्रकारचे हलवे, कापडी हत्ती यासारख्या हलव्याच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत नवविवाहीत जोडप्यांचा पहिला संक्रांत सण साजरा केला जात असल्याने या दागिन्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे विक्रेते सांगतात. साधारणत थंडी पडायला सुरूवात झाली की हलव्याचे दागिने बनवण्याचे काम सुरु होते. हवामानातील बदल, साखरेचे दर यावर या 2000 दागिन्यांच्या किंमती अवलंबून असतात. पण मात्र एक किंमत निश्चित झाल्यावर मात्र त्यात आम्ही काही बदल करत नसल्याचे त्यांनी सांगितले. हलव्याच्या दागिन्यांचे नाजूक कलाकुसर असते. त्यामुळे दागिन्यांमधील एक जरी हलवा निघाला तरी संपूर्ण दागिना होत असल्याचे विक्रेते सांगतात. त्यासाठी या दागिन्यांची हाताळणी नाजूकपणे करावी लागत असल्याचे ते सांगतात. संक्रांतीचे औचित्य साधून लहान मुलांचं आणि मुलींचं बोरन्हाण केलं जातं. त्यासाठी काळं झबलं, कपडे घालून बाळाला हलव्याचे विविध दागिने परिधान केले जातात. या दागिन्यांमध्ये मुलींसाठी मुकूट, बाजूबंद, गळ्यातला हार, कंबरपट्टा, राधासेट तर मुलांसाठी कृष्ण सेट उपलब्ध झाला आहे.

Exit mobile version