| चिरनेर | वार्ताहर |
उरण कोप्रोलीमार्गे अलिबाग येथे प्रवाशांना घेऊन जाणार्या एसटी बसच्या फेर्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी रायगड जिल्हा महिला संघाच्या अध्यक्षा जयवंती गोंधळी यांनी केली आहे. उरण बस स्थानकातून कोप्रोली मार्गावरून सकाळी 8.30 वाजता अलिबाग एसटी बस स्थानकात जाणारी एकच एसटीची बस आहे. उरणवरून अलिबागकडे जाणार्या या प्रवासी मार्गावर चिरनेर, कोप्रोली, खोपटे, आवरे वशेणी, सारडे, केळवणे, दिघाटी, साई, खारपाडा तसेच या मार्गावरील अन्य प्रवाशांचा सकाळी मोठा ताफा पाहायला मिळतो. या मार्गावरून जाण्यासाठी ही एकच सकाळी बस असल्यामुळे प्रवासाच्या अर्ध्याच मार्गावर ही बस पूर्ण भरलेली असते. त्यामुळे या मार्गावरील पुढील प्रवाशांना गाडीत जागा नसल्यामुळे प्रवास करता येत नाही. त्यामुळे नाईलाजाने खाजगी वाहनांचा आधार घेऊन या मार्गावरून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एसटी बसच्या फेर्यामध्ये वाढ करुन ही सेवा लवकरात लवकर सुरू केल्यास त्या त्या परिसरातील प्रवासी आपल्या वेळेप्रमाणे प्रत्येक थांब्यावर उभे राहून, एसटी बस सेवेचा लाभ घेऊ शकतील.