उरणमधील बांधकामांची चौकशी करण्याची मागणी

। उरण । वार्ताहर ।
उरण नगरपालिका हद्दीत अनेक बेकायदेशीर बांधकामे सुरू आहेत. याबाबत प्रशासन कोणतीच कारवाई करीत नसल्याने बेकायदेशीर बांधकाम धारकांचे फावत आहे. काही बांधकाम धारकांनी दुरुस्तीसाठी परवानगी घेऊन जुने बांधकाम पाडून नव्याने बांधकाम सुरू केले आहे. तर काहींनी परवानगीपेक्षा अधिक बेकायदेशीर बांधकाम केले असल्याचे समजते. याबाबत नगरपालिका बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाकडे तक्रार करूनही कारवाई करण्यास चालढकलपणा सुरू आहे. त्यामुळे अधिकारी वर्गाविरोधात जनतेत नाराजीचा सूर निघत आहे.


नगरपालिकेच्या माध्यमातून समाजमंदिराचे स्लॅब टाकण्याचे काम रात्री झाले आहे. याची लेखी तक्रार करून मुख्याधिकारी संतोष माळी व बांधकाम विभागाचे झुंबर माने यांच्याशी संपर्क साधूनही एक दीड महिना उलटूनही कोणतीच कारवाई होत नाही. तसेच भर बाजारपेठमधील राम मंदिराचे बांधकाम अनधिकृतपणे सुरू असतानाही त्यावर अधिकारी वर्गांनी पट्टी बांधली असल्याने आजतागायत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. विचारणा केली असता न्यायालयीन कक्षात असल्याचे सांगतात. बांधकामास कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले. मग ही बांधकामे सुरू कशी आहेत. यावरून संबंधित अधिकारी वर्ग अशा गोष्टींना खतपाणी घालत असल्याचे उघड होते. तरी याची वरिष्ठ अधिकार्यांनी याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Exit mobile version