बायोमेट्रिक हजेरीसाठी सक्तीची मागणी

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

जोडून सुट्ट्या आल्या की बॅगा भरून गावाची वाट धरायची आणि सुट्ट्या संपवून कार्यालयात परतल्यावर मस्टरवर सलग सह्या ठोकून हजेरी लावायची. श्रीवर्धन तालुक्यातील बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये देखील सध्या असाच कारभार उघडपणे सुरू आहे. अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत चाललेल्या या ‌‘दांडीबहाद्दरी‌’मुळे सर्वसामान्य जनतेची मात्र पुरती हेळसांड होत आहे. या बेजबाबदार आणि मनमानी कारभाराला तात्काळ आळा घालण्यासाठी तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी तातडीने सक्तीची करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सरकारी पगार पूर्ण घ्यायचा, पण जनतेच्या कामाच्या वेळी गायब राहायचे, हा पायंडा श्रीवर्धनमध्ये नवा नाही. विशेषतः सण-उत्सव किंवा लागोपाठ येणाऱ्या सुट्ट्यांच्या काळात शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट असतो. लांबून येणाऱ्या ग्रामस्थांना “साहेब दौऱ्यावर आहेत” किंवा “मीटिंगमध्ये आहेत” अशी ठरलेली उत्तरे देऊन परत पाठवले जाते. मस्टरवर डिजिटल वेळेची नोंद नसल्याचा फायदा घेत, हे कर्मचारी नंतर आरामात मस्टरवर राहिलेल्या सह्या पूर्ण करून पगार लाटतात. वरिष्ठ प्रशासनाने आता डोळेझाक न करता श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक शासकीय विभागात तात्काळ “बायोमेट्रिक हजेरी” यंत्रणा कार्यान्वित करावी. जोपर्यंत डिजिटल हजेरी प्रणाली येत नाही, तोपर्यंत हा भ्रष्टाचार थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Exit mobile version