आंबा पिकाच्या पंचनाम्याची मागणी

| सुधागड-पाली | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यातील अनेक ठिकाणी हवामानातील सतत बदलामुळे आंब्याचा मोहर करपल्याचे चित्र दिसून आले आहे. यावर्षी आंबा पिक चांगल्या पद्धतीने येईल अशी अपेक्षा होती. मात्र, वातावरणातील अनिश्चिततेमुळे मोहर वाळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक बागांमध्ये मोहर जळाल्याने फळधारणेवर थेट परिणाम झाला असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान गंभीर स्वरूपाचे झाले आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, हवामान बदलामुळे झालेल्या नुकसानीची केवळ पाहणी पुरेशी नाही. नुकसानग्रस्त बागांचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवणे ही कृषी विभागाची जबाबदारी आहे. शासनाच्या निर्देशांनुसार पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय किसान संघ रायगड जिल्हाच्या वतीने तहसीलदार व कृषी विभागाकडे निवेदन दिले. संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशासनाला ठामपणे सांगितले की, पंचनामे न झाल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. भारतीय किसान संघाने स्पष्ट इशारा दिला आहे की, कृषी विभागाने तातडीने सर्व नुकसानग्रस्त ठिकाणी पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवावा. अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल.
या निवेदनावर भारतीय किसान संघ रायगड जिल्हा अध्यक्ष प्रमोद तुकाराम लंगी, जिल्हा मंत्री राजू केरू कदम, जिल्हा सहमंत्री रसिका अनिल फाटक, राजेंद्र राऊत यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version