महाविकास आघाडीची महावितरणवर धडक
| चिपळूण | प्रतिनिधी |
स्मार्ट वीजमीटर व अनियमित पुरवठ्याच्या विषयावरून महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील महावितरण कार्यालयावर सोमवारी धडक देण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट वीज मिटर विरोधातील संताप व्यक्त करीत नवीन मीटर बसवण्यास स्थगिती देण्याची मागणी केली. त्यानुसार कार्यकारी अभियंता धनंजय भांबरे यांनी स्मार्ट मीटरला चार दिवसाची तात्पुरती स्थगिती देत असल्याचे सांगितले.
महाविकास आघाडीचे नेते रमेश कदम, ठाकरे शिवसेनेचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, तालुकाध्यक्ष लियाकत शाह, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम गुजर, सचिन शेट्ये, यशवंत फके, अजित गुजर आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पदाधिकारी म्हणाले, शहरासह तालुक्यात नागरिकांची संमत्ती नसतानाही जबरदस्तीने स्मार्ट विजमीटर बसवण्यात येत आहे. ज्यांच्या घरी कोणी नाही तेथेही लॉक तोडून मीटर बसवण्याचे प्रकार सुरू आहेत. ज्या-ज्या ठिकाणी नवीन स्मार्ट वीजमीटर बसवण्यात आले, तेथील ग्राहकांची वीजबिले वाढल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांवर जबरदस्तीने मीटर बसवण्यात येऊ नयेत, या प्रक्रीयेला त्वरित स्थगिती देण्याची मागणी केली.
शहरासह ग्रामीण भागात सातत्याने वीजपुरवठा खंडीत होतो. गेल्या चार वर्षाच्या तुलनेत वीजपुरवठा खंडीत होण्याच्या घटना वाढल्या आहेत. नियमित वीजपुरवठा होत नसल्याने विद्यार्थ्यांसह, व्यापारी, व्यावसायिक, उद्योगधंदे, वैद्यकीय सेवा तसेच घरगुती वीजवापरावर विपरीत परिणाम झाला आहे. नगरपरिषद व महावितरणच्या झालेल्या वादात नागरिकांना वेठीस धरले गेले. दोन शासकीय कार्यालयातील वादाचा बडगा सामान्य नागरिकांवर उगारणे ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी जनजागृती व नागरिकांची संमत्ती घेण्यात यावी. शहर व ग्रामीण भागात नियमित खंडीत होणार वीजपुरवठा सुरळीत करावा, नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निरसन करावे, अशी मागणी करण्यात आली. या मागण्यांच्या गांभीर्याने विचार न केल्यास महाविकास आघाडी तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला.
