सर्वपक्षीयांची महावितरणवर धडक
| रोहा | प्रतिनिधी |
स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात सर्वहार जन आंदोलन व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी रोहा महावितरण कार्यालयावर बुधवारी (दि.15) जनआक्रोश धडक मोर्चा काढला. हा मोर्चा रोहा रायकर पार्क ते महावितरण कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.
‘महावितरणचा निषेध असो, प्रिपेड मीटरच्या निर्णयाचा धिक्कार असो, बंद करा बंद करा.. स्मार्ट मीटर बंद करा’ अशा घोषणा देत मोर्चेकरांनी रोहा शहर दणाणून सोडले. स्मार्ट मीटरची सक्ती ताबडतोब बंद करावी, आमचा यास पूर्णपणे विरोध आहे, असा स्पष्ट इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी महावितरणला दिला.
सध्या रोहा शहर व ग्रामीण भागात विजेचे जुने मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा सर्वत्र सुरू असून, त्याला विरोधदेखील होत आहे. परंतु, त्या विरोधाला न जुमानता महावितरणचे ठेकेदार बिनदिक्कत स्मार्ट मीटर बसवत आहेत. त्यामुळे विजेचे बिल तिप्पट येत असल्याने नागरिकांची मोठी ओरड होत आहे. त्याची दखल घेत सर्वहरा जनआंदोलन व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी पुढाकार घेत मोर्चाची हाक दिली होती. त्याला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला आणि बुधवारी मोर्चा थेट रोहा येथील महावितरण कार्यालयावर धडकला.
यावेळी सर्वहार जनआंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, तालुका अध्यक्ष तुषार खरीवले, मनसे जिल्हा सचिव अमोल पेणकर, मनसे माजी तालुका अध्यक्ष अक्षय रटाटे, मनविसे रोहा तालुका अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, रोहा तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील देशमुख, सर्वहार जनआंदोलन जिल्हाध्यक्ष सोपान सुतार, शिवसेना (ऊबाठा) तालुका प्रमुख नितीन वारंगे, माजी तालुका प्रमुख विष्णू लोखंडे, सल्लागार रमेश विचारे, सुधीर सोनावणे, उपतालुका प्रमुख सचिन फुलारे, उपाध्यक्ष पांडुरंग वाघमारे, कार्याध्यक्ष चंद्रकांत गायकवाड व रोहेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, हा मोर्चा रोहा महावितरण कार्यालयाच्या समोर येताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे कार्यकरी अभियंता प्रमोद दालू यांची भेट घेऊन आपल्या मागण्याचे निवेदन देत स्मार्ट मीटरला तीव्र विरोध दर्शवला. यापुढे एकही प्रीपेड मीटर बसवता कामा नये, तसेच जे स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत, ते एक महिन्याच्या आत तात्काळ काढण्यात यावेत, नवीन स्मार्ट मीटरमुळे आलेली वाढीव बिले तात्काळ कमी करण्यात यावी, महावितरण कंपनीचे खासगीकरण करणे तात्काळ थांबवा, या प्रमुख मागण्यांसह रायगड जिल्ह्यात सुरु केलेली स्मार्ट प्रीपेड मीटर योजना तात्काळ थांबवण्यात यावी, असा स्पष्ट इशाराच यावेळी देण्यात आला. यावेळी नागरिकदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावणार असे जाहीर करून हे मीटर कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी फसवी व चुकीची जाहिरात केली आहे. या संबंधातील टेंडर मंजूर करून सर्वत्र मीटर लावण्याची मोहीम सुरू झालेली आहे. वास्तविक हे मीटर मोफत लावले जाणार नाहीत. केंद्र सरकारचे अनुदान वगळता या मीटरचा उर्वरित सर्व खर्च वीजदर निश्चिती याचिकेद्वारे आयोगाकडे मागणी केला जाईल आणि आयोगाच्या आदेशानुसार वीज दरवाढीच्या रुपाने 1 एप्रिल 2025 पासून ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाईल, हे निश्चित व स्पष्ट आहे. त्यामुळे केवळ महावितरण कंपनी वा येणाऱ्या खासगी वितरण कंपन्या वा सरकार यांच्या हितासाठी आणि खासगीकरणाच्या वाटचालीतील पुढचा टप्पा म्हणनूच ही योजना आणलेली आहे, असे स्पष्ट दिसून येत.






