उदय सामंत यांचे आश्वासन फोल
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानसाठी 2008 मध्ये कर्जत-नेरळ मार्गे माथेरान मिनीबस सेवा सुरू करण्यात आली होती. ही सेवा सुरू होऊन जवळपास सतरा वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु, या मार्गावर आजही जुनीच मिनीबस धावत असून नेहमीच तांत्रिक बिघाडामुळे ही सेवा नियमितपणे उपलब्ध होत नाही. त्यासाठी परिवहन मंत्र्यांनी लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मागील वर्षी मंत्री उदय सामंत यांनी नवीन बस देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप या कर्जत-माथेरान मार्गावर नवीन बस काही उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.
सुरुवातीच्या काळात स्थानिकांनी अनेकदा संघर्षाला सामोरे जाऊन सुरक्षित प्रवास उपलब्ध व्हावा यासाठी कठोर परिश्रम घेऊन ही मिनीबसची सेवा उपलब्ध करून घेतली होती. त्यावेळेस शासनाने या मार्गावर दोन मिडीबसेस देण्यात आल्या होत्य. त्यातीलच एक बस आजही कर्जत-पनवेल अशी फेर्या मारत असून एक बस कर्जत-नेरळ मार्गे माथेरान अशा फेर्या करत आहे. परंतु, ही बस घाट रस्त्यात वारंवार बंद पडत असते. त्यामुळे शालेय विद्यार्थी, व्यापारी वर्ग त्याचप्रमाणे नियमित प्रवास करणार्या प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मिनीबसच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातून सर्वाधिक भरघोस उत्पन्न मिळत असताना देखील परिवहन महामंडळ याकडे का दुर्लक्ष करीत आहेत, असा प्रश्न स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे.