मनोज जरांगेंना उमेदवारी द्याः वंचित

| मुंबई | प्रतिनिधी |

वंचित बहुजन आघाडीने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना जालनामधून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे. प्रकाश आंबेडकर यांची ही मागणी महाविकास आघाडी मान्य करते का ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. लोकसभेच्या जागावाटपाबाबत या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे नेतेदेखील सहभागी झाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना जालनामधून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच कोणत्याही पक्षाशी युती नसताना 27 मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीने लढण्याची तयारी केली आहे. ते मतदारसंघ कोणते याची यादी देखील बैठकीत वंचितकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला 4 महत्त्वाचे प्रस्ताव पाठवले आहेत.

त्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभिजित वैद्य यांना कॉमन कॅण्डीडेट म्हणून जाहीर करावे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान 15 ओबीसी उमेदवार असावेत. महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाने असे लेखी वचन दिले पाहिजे की, पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर भाजपामध्ये सामील होणार नाही. किमान 03 अल्पसंख्यांक उमेदवार असण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

Exit mobile version