शासकीय कार्यालयातील पाणपोई नामशेष

। उरण । वार्ताहर ।

उरण परिसरातील नागरीकांसह विद्यार्थी व शेतकरी हे आपल्या शासकीय कामांसाठी शासकीय कार्यालयात ये-जा करत आहेत. मात्र, उरण तहसील कार्यालयाच्या प्रांगणात असलेली पाणपोई नामशेष झाल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठीची गैरसोय होत आहे. तरी प्रत्येक शासकीय कार्यालयात अधिकारी वर्गाने नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

उरण तालुक्याचा पारा 38 ते 40 अंशांवर जात आहे. अशा वाढत्या उन्हामुळे आजारांची समस्याही निर्माण झाली आहे. तसेच, उष्माघाताचा त्रास जाणवत असल्याने गार पाणी पिण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. एकंदरीत वातावरणातील या बदलाने थंड पेयांना मागणी वाढली आहे. परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, नागरिक हे आपली शासकीय कामे करुन घेण्यासाठी उरण शहरातील शासकीय कार्यालयात ये-जा करत आहेत. अशा शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यात उरण तहसील कार्यालयाच्या प्रांगणात असलेली पिण्याच्या पाण्याची पाणपोई नामशेष झाल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होत आहे. तरी प्रत्येक शासकीय कार्यालयात नागरिकांसाठी अधिकारी वर्गाने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करावी, अशी मागणी नागरिक व्यक्त करीत आहेत.

Exit mobile version