। महाड । प्रतिनिधी ।
महाड येथून पुण्यात जाण्यासाठी वरंध भोर मार्ग हा जवळचा मार्ग असून अतिवृष्टी व घाटातील रस्ता रुंदीकरण कामामुळे हा घाट वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, आता या घाटातून वाहतूक सुरु झाली असून महाड पुणे बस ज्या माणगाव ताम्हिणीमार्गे जातात त्या बस आता भोरमार्गे सुरु कराव्यात, अशी मागणी महाड पत्रकार संघाच्यावतीने आगार व्यवस्थापकांना करण्यात आली आहे.
महाड येथुन पुणे या ठिकाणी असंख्य प्रवासी प्रवास करीत असतात. यामध्ये उच्च शिक्षणासाठी जाणार्या मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. रोज जवळपास 20 ते 25 बसेस या मार्गावर वाहतूक करीत असतात. महाडसाठी वरंध भोरमार्गे पुणे हा मार्ग जवळचा असून जवळपास 40 ते 50 किमीच्या अंतराची व वेळेची बचत होते. मात्र, अतिवृष्टी व घाटातील रस्ता रुंदीकरण कामामुळे महामार्ग विभागाने या घाटातील वाहतूक बंद केली होती. पर्यायी माणगाव ताम्हिणी मार्गे प्रवास करावा लागत असून अंतर अधिक असल्याने प्रवाशांना तिकीटाचा अधिकचा भुर्दंड सोसावा लागत आहे. मात्र, आता पावसाचे प्रमाण कमी झाले असून, भोर मार्गे वाहतूकदेखील सुरू झाली आहे. याची दखल घेत प्रवाशांच्या सेवेसाठी महाड पत्रकार संघ पुढे आला असून महाड आगार व्यवस्थापक व महामार्ग विभागाला संघाकडून या बाबतीत निवेदन देण्यात आले आहे. तसेच, गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर लवकरच भोरमार्गे बस वाहतूक सुरू केली जाईल, असे आगार व्यवस्थापक फुलपगारे यांनी सांगितले आहे.