वैभव खेडेकर यांचा इशारा
| महाड | प्रतिनिधी |
बाहेरून आलेल्या परप्रांतीय नागरिकांची प्रशासनाकडून चौकशी आणि नोंदणी केली जावी या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने येत्या महिनाभरामध्ये याबाबत कार्यवाही झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिला आहे.
वैभव खेडेकर यांनी परप्रांतीय नागरिकांच्या बाबतीत नोंदणी आणि चौकशी करण्याबाबत 14 जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनाबाबत दि. 17 एप्रिल रोजी प्रशासनाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी वैभव खेडेकर, महाड शहर पोलीस निरीक्षक संतोष जाधव, महाड पंचायत समितीचे प्रतिनिधी, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष सुबोध जाधव, उपजिल्हाध्यक्ष चेतन उतेकर, रायगड जिल्हा सचिव अमोल पेणकर, महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत परप्रांतीय नागरिकांच्या चौकशीचा आणि नोंदणीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. दि. 11 जानेवारी अक्षय भोसले यांनी दिलेल्या पत्राबाबत अद्याप कार्यवाही न झाल्यामुळे बैठकीला उपस्थित पदाधिकार्यांनी नाराजी व्यक्त केली. ज्या कंपनी नक्षलवादी कामगार काम करताना भेटतो त्या कंपनीवर अद्याप कारवाई का झालेली नाही, असा प्रश्नदेखील यावेळी उपस्थित करण्यात आला. अमित शहा यांच्या दौर्याच्या पूर्वी बिर्ला कंपनीमध्ये ठेकेदार पद्धतीने काम करणारा एक कामगार नक्षलवादी म्हणून सापडतो, त्यामुळे या कंपनीवर आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली.