भाडेकरूंची नोंद करण्याची मागणी

। चिरनेर । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यातील चिरनेर या ग्रामीण भागात भाड्याने राहणार्‍या सर्व भाडेकरू नागरिकांच्या माहितीची नोंद ग्रामपंचायत तसेच पोलीस ठाण्यात नोंदवायला हवी, अशी मागणी चिरनेर ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि.16) पार पडलेल्या ग्रामसभेतून केली आहे.

उरण तालुक्यातील चिरनेर परिसरात मागील काही वर्षापासून ग्रामपंचायतींच्या हद्दीत परप्रांतीय लोक व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत. तसेच, ते ज्या गावात भाडेकरू म्हणून राहतात त्यांच्यासोबत त्यांचे गाववाले अनाधिकृतपणे वास्तव्यास ये-जा करत असतात. कित्येक ग्रामपंचायतींकडे या भाडेकरूंची नोंद नसते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई, उरण परिसरात घडलेल्या निर्घुण हत्या, चोर्‍या व घरफोड्यांचे प्रकार तसेच परप्रांतीयांकडून स्थानिकांना झालेली मारहाण असे गंभीर प्रकार घडत आहेत. अशा धक्कादायक प्रकारातून संभाव्य धोका टाळता यावा आणि येथील नागरिकांना सुरक्षितता मिळावी यासाठी चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चिरनेर ग्रामपंचायत आणि नजीकच्या पोलीस ठाण्यात भाडेकरूंचा भाडेकरार आणि त्यांच्या मुळगावचा निवासी पत्ता, आधार कार्ड इत्यादी सर्व माहितीची नोंद भाडे मालकांनी करावी, अशा प्रकारची मागणी ग्रामसभेतून चिरनेर ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, अलंकार परदेशी, संजय पाटील तसेच चिरनेर ग्रामपंचायतींच्या सर्व सदस्यांनी या मागणीला मान्यता दिली असून, लवकरच याबाबत भाडेकरूंच्या माहितीची नोंद ग्रामपंचायत व पोलीस ठाण्यात केली, जाईल असे आश्‍वासन दिले आहे.

Exit mobile version