कळंबोली शहर मनसेची मागणी
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कळंबोली शहरातील काही भागात मागील काही दिवसापासून कमी दाबाने अपुरा आणि दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. याविरोधात कळंबोली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा न केला गेल्यास कळंबोलीतील सिडको कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा काढण्याचा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आला आहे.
वसाहतीमधील सेक्टर 3, 4 आणि 5 या भागातील घरांना अत्यंत कमी दाबाने दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे, तसेच आठवड्यातील दोन-तीन दिवस पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. पालिकेच्या स्थापनेपूर्वी वसाहतीमधील या भागात सिडकोकडून करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठ्यापोटी 120 रुपये देयक आकारले जात होते. पालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोने या ठिकाणी पाण्याचे मीटर बसवले असून, यामुळे नागरिकांना एक ते दीड हजार रुपये पाणी बिलापोटी भरावे लागत आहेत. असे असतानाही पुरेसे पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नसल्याने कळंबोली प्रभाग 8 चे मनसे उपविभाग अध्यक्ष विवेक बोराडे यांनी येत्या आठ दिवसांच्या आत शहरांमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा उच्च दाबाने जर आपण केला नाही, तर कळंबोली शहर मनसेतर्फे महिलांचा प्रचंड मोठा हंडा मोर्चा आणण्याचा इशारा देणारे पत्र दिले. याप्रसंगी मनसे कार्यकर्ते नितीन काळे, महिला जिल्हा सचिव स्नेहल बागल, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गिरीश तिवारी, महाराष्ट्र सैनिक योगेश इंगळे उपस्थित होते.