पुण्यात ‘सेल्फ अँटिजेन कोविड किट’ची मागणी वेगाने वाढली

। पुणे । वृत्तसंस्था ।
कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने माय लॅबने विकसित केलेल्या ‘सेल्फ अँटिजेन कोविड किट’ची मागणी वेगाने वाढली आहे. कोरोना लक्षणे असलेल्या आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांकडून याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू असल्याची माहिती औषध विक्रेत्यांकडून मिळाली.
‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे ड्रगिस्ट’चे सचिव अनिल बेलकर म्हणाले, ‘हे किट वापरण्यास सोपे आहे. तसेच त्याचा निष्कर्ष विश्‍वासार्ह असल्याने याला नागरिकांनी पसंती दिली आहे. यातून कोरोना झाल्याचे निदान झाल्यास त्यावर उपचारासाठी डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. तसेच, औषधोपचारादरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे गृह विलगीकरणात राहाणे आवश्यक आहे.’’
इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या महाराष्ट्र शाखेचे सचिव डॉ. मंगेश पाटे म्हणाले, ‘कोरोना निदानासाठी नागरिकांकडून ‘कोविड सेल्फ टेस्ट किट’ वापरण्यात येत आहे. त्यासाठी कोणत्याही डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही. औषधाच्या दुकानातून हे किट विकत घेऊन नागरिक घरातच याची चाचणी करू शकतात. त्याची सरकारी नोंद आवश्यक आहे. ती नागरिकांनी केली पाहिजे. तसेच, हे किट डॉक्टरांकडे उपलब्ध केल्यास एकाच ठिकाणी निदान आणि उपचार मिळू शकतील.

Exit mobile version