। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड शहरापासून काही अंतरावर असलेल्या विहूर ग्रामपंचायत हद्दीतील विहूर, बौद्धवाडी व मोरा या गावांना अद्याप मोबाईल टॉवर नसल्याने अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या परिसरात लवकरात लवकर मोबाईल टॉवरची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
विहूर ग्रामपंचायत हद्दितील विहूरसह बौद्धवाडी आणि मोरा या गावांची सुमारे तीन हजार लोकसंख्या आहे. या परिसरात बाहेरून आलेल्या सुमारे चार-पाचशे लोकांची वस्ती आहे. प्रत्येक घरामध्ये मोबाईल आहेत. पण मोबाईल असुनही ग्रामस्थांना नेटवर्क अभावी वंचित राहावे लागत आहे. या परिसरात अनेक शैक्षणिक संस्था, शिक्षक, डॉक्टर, शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालय व कर्मचारी आहेत. सर्व शैक्षणिक संस्था ऑनलाईन अभ्यास घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच, हॉटेल-रिसॉर्ट सुद्धा आहेत. यामुळे या ठिकाणी पर्यटकांची ये-जा असते. येथील पेट्रोल पंपावर येणार्या ग्राहाकांची व पर्यटकांची ऑनलाईन पैसे भरण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे.