। पनवेल । वार्ताहर ।
मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकांवर असलेले लोखंडी संरक्षक कठडे तुटून पडल्याने गेल्या आठवडाभरात अनेक वाहनांच्या अपघातांची घटना घडल्या आहेत. तसेच, मुसळधार पडणार्या पावसामुळे अपघातासोबत जखमींच्या संख्येतदेखील वाढत होत होती. कांतीलाल कडू यांच्या सामाजिक दबावापुढे एमएसआरडीसीने दखल घेत तात्काळ संरक्षक कठडे उभारले आहेत.
पनवेल तालुक्यातील पळस्पे फाट्यावरून मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावरून जाताना डेरवली गावाजवळ काही वाहनांची धडक बसून येथील संरक्षक कठडे तुटले होते. यात पावसाच्या थैमानाने रात्रीच्या अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने अनेक वाहने तुटलेल्या संरक्षक कठड्याच्या मोकळ्या जागेतून आरपार जात होती. यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. येथे शोभेची झाडे लागवडीकरिता रुंद दुभाजक तयार केल्याने बर्यापैकी मोकळी जागा निर्माण झाली होती. तसेच, पावसामुळे चिखलमय स्थिती झाली होती. यामुळे अपघाताचे प्रमाण आपोआप वाढले आणि वाहतुक कोंडीतदेखील भर पडत पडली. यासंदर्भात धैर्यशील नागावडे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्यांना माहिती देऊन दुभाजकावरील तुटलेले संरक्षक कठडे तातडीने नव्याने बांधण्याची मागणी केली. आठवडाभराच्या पाठपुराव्यानंतर आश्वासनाचा फक्त डोंगर उभा राहिला होता. अखेर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांना सांगितले असता त्यांनी एमएसआरडीसीचे अभियंता सचिन देवरे यांना संरक्षक कठडे तातडीने बसवण्याची विनंती केली. याची तात्काळ दखल घेत दुसर्याच दिवशी एमएसआरडीसीने साहित्याची जुळवाजुळव करत दोन दिवसांत संरक्षक कठडे बसविण्यात आले. याबद्दल कांतीलाल कडू यांचा पनवेलकरांनी आभार मानले आहेत.