घरांच्या मालमत्ता कर वसूलीस स्थगिती देण्याची मागणी

। पनवेल । वार्ताहर ।
कळंबोली परिसरातील घरांच्या मालमत्ता कर वसूलीस स्थगिती द्यावी तसेच नुकत्याच अतिवृष्टीमुळे झालेल्या घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपायी द्यावी अशी मागणी शिरीष घरत व रामदास शेवाळे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन केली.

दोन दिवसांपूर्वी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अतिवृष्टी होऊन कळंबोली येथील एलआयजी तथा केएल 3, 4 व 5 या भागात पाण्याचा योग्य तर्‍हेेने निचरा न झाल्याने घरात तसेच सोसायटीत पाणी साचून गरीब व माथाडी कामगारांच्या घरात पाणी शिरले. तसेच त्यांच्या मालमत्तेचे अपरिमित असे नुकसान झालेले आहे.

आधीच कोव्हिड संसर्गजन्य रोगामुळे गरीब लोकांचा आर्थिक कणा मोडला होता. यातच महानगरपालिकेच्या व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे नाले सफाई तथा खराब विद्युत पंपामुळे सामान्य जनतेची घरे पाण्याखाली बुडाली होती. तरी या गरीब जनतेचे अतिवृष्टीमुळे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

माथाडी बांधवांचेसुद्धा मोठे नुकसान झाल्याने कळंबोली परिसरातील घरांच्या मालमत्ता कर वसूलीस स्थगिती द्यावी तसेच नुकत्याच अतिवृष्टीमुळे झालेल्या घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपायी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Exit mobile version