। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील सुकेलीखिंड हे निर्जन ठिकाण असून या महामार्गांवरून असंख्य छोटी-मोठी वाहने ये-जा करीत असतात. या ठिकाणी छोटे-मोठे अपघात होत असतात. यामुळे प्रवाश्यांच्या सुरक्षतेसाठी सुकेली खिंडीत पथदिवे व कायम स्वरूपी पोलिस चौकीची गरज आहे, असे प्रवाशी वर्गातून बोलले जात आहे.
दोन्ही बाजूला चढ-उतार असून आजूबाजूला घनदाट जंगल व झाडीझुडपे आहेत. यातून रात्रीच्या वेळी मार्ग काढतांना या महामार्गावरील रस्ता अंधारामुळे वाहन चालकांच्या चटकन निदर्शनास येत नाही. यामुळे येथे अनेकवेळा छोटे मोठे अपघात होत असतात. तसेच सुकेली खिंडीच्या आसपास वस्ती नाही यामुळे अपघातग्रस्त वाहनचालकांसह प्रवाश्यांना त्वरित मदत मिळण्यासाठी विलंब लागतो. परिणामी अपघातग्रस्त दवाखान्यापर्यंत पोहोचेल याची खात्री देता येत नाही. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी सुकेली खिंडीत पथदिवे व पोलिस चौकीची गरज निर्माण झाली असून याकडे संबंधितानी लक्ष देऊन पथदिवे व पोलिस चौकी सुरु करावी, अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.