। पनवेल । प्रतिनिधी ।
मार्च महिन्याची उष्णता सुरू होताच शहरात उकाडा जाणवू लागला असून, नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय करताना दिसत आहेत. दुपारच्या वेळेत तापमान वाढत असल्याने रस्त्यांवरील उसांच्या रसाच्या गाड्यांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे.
थंडगार उसाचा रस पिण्यासाठी अनेक जण थांबत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः महिला वर्ग उन्हापासून बचावासाठी स्कार्फ बांधून बाहेर पडताना दिसत आहेत. काहीजण टोपी, गॉगल तसेच रुमालाचा वापर करत आहेत. उन्हाचा तडाखा वाढल्याने अनेक नागरिक झाडांच्या सावलीचा आधार घेत थोडा विसावा घेताना दिसत आहेत. दुपारच्या वेळेत रस्ते काहीसे ओस पडत असले तरी थंड पेये व उसाच्या रसाच्या ठेल्यांवर मात्र चांगली वर्दळ पाहायला मिळत आहे. मार्चच्या सुरुवातीलाच उष्णतेची चाहूल लागल्याने एप्रिल-मे महिन्यात उकाडा आणखी वाढण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.







